प्रदेशाध्यक्षांच्या नावे ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून काँग्रेस कार्यकर्त्याची आत्महत्या
देश बातमी

प्रदेशाध्यक्षांच्या नावे ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून काँग्रेस कार्यकर्त्याची आत्महत्या

चंदीगढ : पंजाबमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याने पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावाने ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करुन आत्महत्या केली आहे. लुधियाना जिल्ह्यातील जंगपूर गावात ही घटना घडली. दलजीत सिंग हॅप्पी (42) असं या मृत व्यक्तीं नाव आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दलजीतसिंग हॅप्पी यांचा प्रीतम सिंगसोबत मालमत्तेसाठी वाद झाला होता. या प्रकरणाचा तपास लुधियाना ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. अशातच गुरुवारी, दलजीतने दारूच्या नशेत घर सोडले आणि नंतर सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप अपलोड केली. त्यामध्ये त्यांनी स्वतःवर ओढवलेल्या परिस्थितीसाठी काही लोकांना दोषी ठरवले आणि सिद्धू यांच्याकडे न्याय मागितला. दलजीतसिंग यांनी अपलोड केलेली क्लिप त्यांच्या भावाला सोशल मीडियावर सापडल्यानंतर त्याने त्यांचा शोध घेतला. त्यानंतर दलजित बुडेल गावाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

दलजीत अविवाहीत होते आणि त्यांच्या मोठ्या भावाच्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांनी विषारी पदार्थाचे सेवन केले होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रीतम सिंगने आपला भूखंड दलजीतला बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी तीन महिन्यांकरिता दिला होता. परंतु नंतर हा भूखंड आपला असल्याचा दावा दलजीतने केला. याविरोधात प्रीतमने पोलीस तक्रार केली होती, ज्याची चौकशी सुरू आहे.

दलजीत यांनी सिद्धूंना उद्देशून तयार केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलंय की, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. पण तुम्ही माझ्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्यांची मदत केली पाहिजे, अशी माझी विनंती आहे. माझी वेळ संपली आहे, पण कृपया माझ्या कुटुंबाला मदत करा. मी मल्कीत सिंह यांना दाखातून तिकीट मिळाल्यापासून काँग्रेस पक्षासाठी काम केले आहे. काँग्रेससाठी पोस्टर्स लावण्यास कोणी बाहेर पडत नव्हतं, अशा भीतीदायक परिस्थितीत मी रात्री गावांना भेटी देऊन पोस्टर्स लावत होतो. त्यानंतर मी युवक काँग्रेसमध्ये सामील झालो. मी हरियाणामध्येही काँग्रेससाठी काम केलं आहे. माझ्याविरोधात खोटी तक्रार करून मला अडकवलं जात आहे. मी ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली आहे, ते ही जमीन त्यांचीच असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबाला मदत करा. पक्षाच्या कामांमुळे माझे लग्न न होऊ शकल्याने मी अविवाहित आहे. मी माझे आयुष्य काँग्रेससाठी वाहिले होते. आज मी हरलोय. माझ्या मृत्यूला काही जण जबाबदार आहेत, मी त्यांची नावं सांगतोय. प्रीतम सिंह, महिंदर सिंह, बलजिंदर सिंग या सर्व लोकांनी माझ्याविरोधात खोटी तक्रार दिली आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की मला खरा काँग्रेस कार्यकर्ता आहे तर कृपया मला न्याय द्या. माझ्या पुढच्या जन्मात मला पुन्हा काँग्रेससाठी काम करायचंय. मी मरेपर्यंत पक्ष सोडला नाही.