ट्विटर युजरने विचारला प्रश्न; मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर
बातमी मुंबई

ट्विटर युजरने विचारला प्रश्न; मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर

मुंबई : ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने खबरदारीचा उपाय म्हणून नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. ५ जानेवारीपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यां नागरिकांना मुंबई पोलिसांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, नियम मोडल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असणाऱ्या मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देखील दिली आहेत. मुंबई पोलिसांनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ‘ऑनलाइन एकत्र या’ असं सांगितलं होतं. मात्र मुंबई पोलीसांच्या ट्विटरवर एका युजरने विचारलेल्या प्रश्नाला दिलेलं उत्तरही चर्चेचा विषय ठरत आहे.

दिपक जैन या ट्विटर युजरने मुंबई पोलिसांना ट्विट करुन विचारलं की, “जर मी तिच्या घरी ११ वाजता पोहोचलो आणि रात्रभर तिथंच राहिलो तर”. त्याच्यावर मुंबई पोलिसांनीही जबरदस्त उत्तर दिलं. मुंबई पोलिसांनी ट्विटरला उत्तर देत म्हटलं आहे की, “तू तिची परवानगी घेतली असशील अशी आम्हाला अशा आहे, अन्यथा आमच्या डोक्यात तुझ्यासाठी राहण्याची एक पर्यायी व्यवस्था आहे”. असे भन्नाट उत्तर देत मुंबई पोलिसांनी #ConsentMatters #SafetyFirstOn31st हे हॅशटॅगदेखील वापरले आहे.

दरम्यान, मुंबईचे सह-पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत मुंबईत ३१ डिसेंबरच्या रात्री नेमक्या कोणत्या गोष्टींना परवानगी आहे आणि कोणत्या अटी पाळाव्या लागणार आहेत यासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे.

या माहितीनुसार,  रात्री ११ वाजल्यानंतरही तुम्ही पार्टी करु शकता…पण यावेळी कमीत कमी लोकं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. गाइडलाइन्सनुसार तुमच्याकडे किती जागा आहे आणि तुमच्या घरात गर्दी आणि शारिरीक संपर्क होत नसेल, सहा फुटांचं अंतर पाळलं जात असेल आणि मास्क वापरले जात असतील तर तुम्हाला परवानगी आहे.

मात्र जर पोलिसांना एखाद्या ठिकाणी गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा कोणी आवाज होत असल्याची तसंच इतर त्रास होत असल्याची तक्रार केल्यास पोलीस कारवाई करु शकतात. तसेच, नववर्षाचं स्वागत करण्यासाठी बोट, हॉल तसंच इतर गोष्टी बूक करण्यासाठी परवानगी आहे.

तुम्हाला ११ नंतरही प्रवासाची परवानगी आहे. मात्र तुमच्या कारमध्ये फक्त चार आणि दुचाकीवर दोन लोकं असतील, तरच ही परवानगी मिळेल. पण यावेळी नाकाबंदीमध्ये तुम्हाला अडवून कुठे जात आहात याबद्दल चौकशी केली जाईल याची तयारी ठेवा.

मर्यादित प्रवाशांसोबत पोलीस कोणीही ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह करणार नाही याचीही काळजी घेतील. तसंच वेगाने वाहनं चालवणाऱ्या आणि नियमांचं उल्लंघन कऱणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.
सार्वजनिक वाहतुकीवर कोणतीही बंधनं नसणार आहेत. जर तुम्ही टॅक्सी, ओला किंवा उबर बूक केलीत तर चालकासहित चौघांनाच प्रवासाची परवानगी आहे. मात्र यावेळी गेल्यावर्षीप्रमाणे लोकांना घरी पोहोचता यावं यासाठी मध्यरात्रीनंतर विशेष बस किंवा ट्रेन नसणार आहे.