पावसाची मुंबईत विश्रांती; या जिल्ह्यांत कोसळणार सरी
बातमी महाराष्ट्र

पावसाची मुंबईत विश्रांती; या जिल्ह्यांत कोसळणार सरी

मुंबई : मुंबईत पावसाला सुरुवात झाली होती. मान्सून दाखल झाल्यानंतर, मात्र मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाचा जोर आणखी वाढला होता. मागील एक आठवड्यापासून मान्सून पावसानं मुंबईकरांना झोडपून काढलं आहे. मुंबईत आज (ता. १३) पावसानं विश्रांती घेतली आहे. पण याठिकाणी अद्याप ढगाळ वातावरण असून हवामान खात्यानं पुढील ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज मुंबईसह, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापुर, सातारा आणि घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. त्याचबरोबर आज मुंबईत सायंकाळी उशिरा मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, आज (ता. १३) रायगड आणि रत्नागिरीला मात्र रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मागील दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. काल (ता. १२) उस्मानाबाद, बीड आणि परभणी या जिल्ह्यात पावसानं चांगलाचं जोर पकडला होता. बीड जिल्हातील केज तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून याठिकाणी 65 मीमी इतका पाऊस पडला आहे. आज सकाळपासूनच मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची नोंद झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी सायंकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस
उद्या म्हणजेच 13 आणि 14 जून रोजी विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम या जिल्ह्यांना हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर उद्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम हे जिल्हे वगळता विदर्भातील अन्य जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.