खगोलप्रेमींसाठी दुर्मिळ क्षण; तब्बल 397 वर्षानंतर सूर्यमालेतील गुरु आणि शनी या दोन्ही ग्रहांची होणार युती
देश बातमी

खगोलप्रेमींसाठी दुर्मिळ क्षण; तब्बल 397 वर्षानंतर सूर्यमालेतील गुरु आणि शनी या दोन्ही ग्रहांची होणार युती

नवी दिल्ली : जगभरातील खगोलप्रेमींना आज अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ असा क्षण अनुभवायला मिळणार आहे. सूर्यमालेतील ग्रहांच्या युतीची एक अत्यंत दुर्मिळ घटना पाहण्याची संधी साऱ्या विश्वाला मिळणार आहे. सूर्यमालेतील गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ येणार आहेत. विशेष म्हणजे ही घटना तब्बल 397 नंतर पुन्हा एकदा घडणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सोमवारी म्हणजेच सायंकाळी 6.30 ते 7 वाजण्याच्या सुमारास देशातील कोणत्याही भागातून ही ग्रहांची युती पाहण्याची संधी सर्वांनाच मिळणार आहे. जैसलमेरच्या वाळवंटी भागातून या दृश्याला पाहण्याचा अनुभव काही औरच असणार आहे. तर, इतर भागांमध्ये शहरी झगमगाटापासून दूर निरभ्र आकाशातून हे दृश्य पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय असणार आहे.

हवामानाची परिस्थिती पूरक असल्यास सोमवारी सुर्यास्तानंतर जगभरातून हे सुरेख दृश्य पाहण्याची संधी खगोलप्रेमीना मिळणार आहे. 21 डिसेंबर 2020 हा यंदाच्या वर्षातील सर्वात लहान दिवस असल्याची बाबही समोर येत आहे. खगोलशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड वेनट्रॉब यांच्या मते, अशा प्रकारची घटना कोणाही व्यक्तीच्या जीवनात फक्त एकदाच घडते. यापूर्वी 17 व्या शतकात म्हणजेच गॅलिलिओच्या जीवनकाळात हे ग्रह इतके समीप आले होते.

अवकाश संशोधकांच्या मते गुरु आणि शनी हे ग्रह दर 20 वर्षांनी एकमेकांच्या जवळून मार्गक्रमण करतात. मुख्य म्हणजे वैज्ञानिकांच्या मते यंदाच्या वेळी या दोन्ही ग्रहांमध्ये फक्त 0.1 अंशाचंच अंतर असणार आहे. त्यामुळं या ग्रहांची युती पाहण्यासाठी सर्वत्र उत्सुकता आहे.

जवळपास 397 वर्षांपूर्वी म्हणजेच जुलै 1623 मध्ये हे दोन्ही ग्रह अतिशय कमी अंतरावर एकमेकांच्या समीप आले होते. पण, त्यावेळी सूर्य फार जवळ असल्यामुळं मात्र त्यांना पाहणं शक्य नव्हतं. त्याहीआधी मार्च 1226 मध्ये हे ग्रह अशाच पद्धतीनं एमेकांच्या समीप आलेले असताना तेव्हा मात्र हे दृश्य पाहता आलं होतं असं म्हटलं जातं.