देशात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे तांडव; २४ तासांत तब्बल एवढे मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे तांडव; २४ तासांत तब्बल एवढे मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यूचं अक्षरशः तांडव सुरु आहे. देशाच्या विविध भागात कोरोनानं हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था गडगडल्याचे चित्र दिसून येत आहे. देशात दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत असून, गेल्या २४ तासांत चार हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद असून, २४ तासांत चार लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या २४ तासांत देशात चार लाख एक हजार ७८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख १८ हजार ६०९ रुग्ण कोरानातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे देशात पहिल्यांदाच चार हजार १८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ३८ हजार २७० इतकी झाली आहे.

तत्पूर्वी, देशात दररोज साडेपाच हजार मृत्यू होतील असा भीती वजा इशारा अमेरिकेतील इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वी दिला होता. हा इशारा खरा ठरतोय की, काय अशी शंका गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून डोकं वर काढताना दिसत आहे. सध्या देशात साडेतीन हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहेत. मात्र, गेल्या २४ तासांतील मृतांची संख्या झोप उडवणारी आहे.