राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा
बातमी महाराष्ट्र

राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात उद्याच जाहिरात निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामविकासमधील आरोग्याशी संबंधित 10 हजार आणि आरोग्य विभागातील 7 हजार अशा एकूण आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या 17 हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी सध्या 50 टक्के म्हणजे 8,500 पदांची जाहिरात उद्या येईल. असेही त्यांनी सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ”जिंजर नावाची एक आयटी कंपनी ही परीक्षा घेणार आहे. महाआयटी कंपनीनं ही कंपनी निवडली आहे. ओएमआर शीट या परीक्षेसाठी असणार आहे. सर्व बाबी पडताळून या कंपनीची निवड करण्यात आली आहे. जीएनएम, नर्सेस, टेक्निशियन, वॉर्डबॉय अशी वेगवेगळी पद असतील. क आणि ड वर्गाच्या पदांची ही भरती असेल. 15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा होईल आणि त्यानंतर दोन तीन दिवसात निकाल लागेल.” त्याबाबत मी आरोग्य सचिवांना सोमवारपर्यंत जाहिरात देण्याबाबत सांगितलं आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना मंत्री टोपे यांनी कोरोना लसीकरणाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, ” महाराष्ट्रात सर्वांना लसीकरणाची गरज नाही. 30 वर्षापेक्षा कमी वयं असलेले आणि ज्यांना आजार नाही त्यांचे लसीकरण करू नये. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रात काल 65 टक्के लसीकरण झाले. यातही केवळ 9 किरकोळ केसेस आढळून आल्या, ज्यांना थोडा त्रास झाला.