रेखा जरे हत्याकांड: आरोपी बाळ बोठे यांना 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
बातमी महाराष्ट्र

रेखा जरे हत्याकांड: आरोपी बाळ बोठे यांना 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

अहमदनगर : अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठेला अटक करण्यात आली आहे. तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठेला अहमदनगरच्या पोलिसांनी हैदराबाद मधून ताब्यात घेतले आहे. आज त्यांना पारनेर न्यायालयात हजर केले असता आरोपी बाळ बोठे यांना 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानंतर अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, बाळ बोठे यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. बाळे बोठे ज्या रूममध्ये थांबले होते त्या रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. तसेच बाळ बोठे यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली. त्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख होता. तसेच त्यांचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कोणाला संपर्क करावा, यासंदर्भातील माहिती सुसाईड नोटमध्ये देण्यात आली होती, असंही बोलताना सांगितलं.

दरम्यान, बाळ बोठे याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाच पोलीस पथक रवाना करण्यात आलेली होती. तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील व गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील बोठे याच्या बंगल्याची झडतीही घेतली होती. झडतीत पोलिसांना बोठे याचे रिव्हॉल्वर मिळून आले होते. बोठेला अटक करण्यासाठी मुंबई, सोलापूरसह हैदराबाद पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर हैदराबाद येथे बाळ बोठे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी बाळ बोठे यांना हैदराबाद येथील एका हॉटेलमधून अटक केली.

या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. तब्बल 102 दिवसानंतर पोलिसांनी बाळ बोठेला अटक केली. इतकेच नाही तर बाळ बोठेला मदत करणाऱ्या इतर पाच जणांना देखील पोलिसांनी जेरबंद केले. विशेष म्हणजे ज्या रूममध्ये बाळ बोठे होते त्या रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. मात्र, तरी देखील पोलिसांनी बाळ बोठे यांना जेरबंद केलं आहे. या अटकेसाठी पोलिसांनी 5 दिवस विशेष ऑपरेशन केले.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत मारेकऱ्यासह पाच आरोपींना अटक केली. या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे यांनी सुपारी देऊन ही हत्या केल्याची माहिती पुढे आली. बाळ बोठे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात करू विविध जिल्ह्यांमध्ये छापे देखील टाकले. मात्र, बाळ बोठे यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले.