प्रजासत्ताक दिन ठरणार ऐतिहासिक; सैनिकांसह शेतकरीही काढणार ट्रॅक्टर परेड
देश बातमी

प्रजासत्ताक दिन ठरणार ऐतिहासिक; सैनिकांसह शेतकरीही काढणार ट्रॅक्टर परेड

नवी दिल्ली : यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक ठरणार आहे. गेल्या आठवडाभरापासून ट्रॅक्टर परेडला परवानगी मिळणार की नाही याबद्दल सस्पेन्स होता. पण अखेर परवानगी मिळाली आहे. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. अनेकदा शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा होऊनही कोणताही तोडगा अद्यापपर्यंत निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या सीमांवर ट्रॅक्टर परेड करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला परवानगी मिळाल्याने प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक ठरणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला देशातील सैनिकांसह शेतकरी देखील राजधानी दिल्लीत परेड करताना दिसतील. सैनिकांसोबत रणगाडे तर शेतकरी त्यांच्या शेतातील साथीदार असणाऱ्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपली ताकद सरकारला दाखवतील. दिल्लीच्या चार सीमांवर जिथे आंदोलन सुरु आहे त्या चारही सीमांवरुन उद्या हे ट्रॅक्टर दिल्लीत बाहेर पडतील. 26 जानेवारीची परेड संपली की ही परेड सुरू होईल.

या ट्रॅक्टर परेडमध्ये 30 हजार ट्रॅक्टर असतील असा दावा पोलिसांनी केला आहे. तर या परेडमध्ये अडीच लाख ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या गावागावातून हे ट्रॅक्टर दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पोहचत आहेत. कुठल्याही परिस्थितीत हिंसा करणार नाही, शांततेत मोर्चा काढू असं आश्वासन शेतकरी नेत्यांनीही पोलिसांना दिलं आहे.

प्रजासत्ताक दिन आणि शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड यात कोणताही घातपात न होण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सर्व शक्यता लक्षात घेऊन ट्रॅक्टर परेडचा हा मार्ग ठरवला आहे. ज्या मार्गावर इमर्जन्सी हॉस्पिटलची सुविधा आहे. त्याच मार्गावर मोर्चाची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता उद्या जितकी उत्सुकता राजपथावरच्या परेडची असेल तितकीच शेतकऱ्यांच्या या ट्रॅक्टर परेडचीही असेल. शेतकऱ्यांचं हे वादळ सरकारच्या मनोबलावर काय परिणाम करतं हे पाहणंही औत्सुक्याचं असेल.