अर्णबने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले; अधिकाऱ्याचा मोठा खुलासा
बातमी मुंबई

अर्णबने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले; अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले असल्याचा धक्कादायक खुलासा ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांनी केला आहे. टीआरपी वाढवून दिल्याच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत शहानिशा करण्यासाठी; तसेच इतरांचा सहभाग पडताळण्यासाठी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ‘बार्क’च्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. इतकेच नाही, तर पार्थ यांची बँकेतील खाती, लॉकरचीही झाडाझडती घेण्यात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अर्णब गोस्वामी यांनी सहा वेळा भेटून पैसे दिल्याचे दासगुप्ता यांनी म्हटले आहे. यातील तीन वेळा मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये झालेल्या भेटीचा तपशील त्यांनी पोलिसांना दिला आहे. या ठिकाणी झालेल्या आर्थिक व्यवहाराचे पुरावेदेखील पोलिसांच्या हाती लागल्याने अर्णव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘रिपब्लिक’कडून हॉलिडे पॅकेज तसेच रोख मोबदला दासगुप्ता यांना मिळाला असून, यातून त्यांनी कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे.

पैसे देऊन टीआरपी वाढवल्याच्या घोटाळ्यात बार्क माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता हेच मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दासगुप्ता यांच्या अटकेनंतर पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याने तपासाला आणखी वेग आला आहे.

पार्थ दासगुप्ता हे ‘बार्क’मध्ये सीईओपदावर असताना टीआरपी मोजण्याचा डेटा आल्यावर त्यामध्ये फेरफार करून आणि त्यानंतरच तो जाहीर केला जाई. ‘रिपब्लिक’ वाहिनीला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी हा खटाटोप केला जात होता. डेटामध्ये फेरफार करण्यास ‘बार्क’मधील अनेकांचा विरोध असायचा. मात्र दासगुप्ता यांनी हाताशी घेतलेले काही जण यासाठी त्यांना मदत करायचे. हे नेमके अधिकारी कर्मचारी कोण आहेत, याबाबत चौकशी करण्यासाठी मंगळवारी दासगुप्ता यांना घेऊन पोलिसांनी ‘बार्क’चे कार्यालय गाठले. त्यांची संपत्ती तपासण्यासाठी बँक खात्यांचा तपशील, बँकेतील लॉकर तसेच इतर गुंतवणुकीबाबत पोलिसांनी चौकशी केली.