युक्रेनमध्ये रहिवासी इमारतीवर कोसळली मिसाईल; स्फोटानं कीव्ह हादरलं
बातमी विदेश

युक्रेनमध्ये रहिवासी इमारतीवर कोसळली मिसाईल; स्फोटानं कीव्ह हादरलं

कीव्ह, युक्रेन : रशियासमोर गुडघे टेकण्यास नकार देणाऱ्या युक्रेनची राजधानी ‘कीव्ह’वर रशियाच्या हल्ल्याचा आजचा तिसरा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर मिसाईलद्वारे हल्ले सुरू आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका जोरदार स्फोटाचा आवाज अनेकांनी ऐकला. रशियाच्या एका मिसाईलनं एका अत्त्युच्च रहिवासी इमारतीला निशाण्यावर घेतल्याचा दावा युक्रेन सरकारकडून करण्यात आलाय.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या हल्ल्याचा एक व्हिडिओ ‘बीएनओ न्यूज’नं शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप मृत्यूंची संख्या हाती आलेली नाही.

युक्रेन परराष्ट्रमंत्र्यांचं जगाला आवाहन

‘आमचे वैभवशाली, शांततापूर्ण शहर कीव्ह दुसर्‍या रात्री रशियन भूदल आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यातून वाचलं. परंतु, रशियन क्षेपणास्त्रानं कीव्हमधील रहिवासी अपार्टमेंटला लक्ष्य केलंच. मी जगाला आवाहन करतोय की : रशियावर बहिष्कार टाका, रशिया आणि त्यांच्या राजदूतांची हकालपट्टी करा, तेल निर्बंध लादून त्यांची अर्थव्यवस्था नष्ट करा. रशियन युद्धखोरांना रोखायला हवं’ असं युक्रेनच्या परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी कीव्ह शहराच्या मध्यभागी नैऋत्य दिशेला दोन क्षेपणास्त्रं डागण्यात आली. त्यातील एक क्षेपणास्त्र ‘झुल्यानी’ विमानतळाजवळ तर दुसरं ‘सेवास्तोपोल स्क्वेअर’जवळ पडलं.