सचिन वाझेबाबत मुंबई पोलीस दलाचा मोठा निर्णय
बातमी मुंबई

सचिन वाझेबाबत मुंबई पोलीस दलाचा मोठा निर्णय

मुंबई : सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेबाबत मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस दलातून त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून हा तपास सुरु होता. २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार आढळून आली होती. तर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ५ मार्च रोजी कळव्यातल्या खाडीमध्ये सापडला होता. आधी या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक करत होतं. मात्र, त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या दोन्ही प्रकरणातल्या आरोपांवरुन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. वाझे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात वाझे यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा एनआयएकडून करण्यात आलेला असून हे कृत्य वाझे यांनी कबूल केले आहे. मात्र अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवणे, अंबानी कुटुंबाला धमकावण्याचा कट त्यांनी एकट्याने रचलेला नाही. या कटात अन्य व्यक्तीही सहभागी असाव्यात, असा संशय असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आलं होतं.