साकीनाका प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश
बातमी मुंबई

साकीनाका प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश

मुंबई : साकीनाका परिसरामध्ये झालेल्या बलात्कार घटनेतील पीडितेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन दिले आहे. दरम्यान, मुंबईतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी त्यांनी यासंदर्भात चर्चा केली आहे. झालेली घटना निंदनीय असून हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.