आणखी एक क्लीनचीट! समीर वानखेडे मुस्लीम नाहीत, जात पडताळणी समितीचा निष्कर्ष
बातमी मुंबई

आणखी एक क्लीनचीट! समीर वानखेडे मुस्लीम नाहीत, जात पडताळणी समितीचा निष्कर्ष

मुंबई: अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. हा समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासाठी खूप मोठा दिलासा मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासह चौघाजणांनी जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. प्रशासकीय सेवेतील नोकरी मिळवताना समीर वानखेडे यांनी आपली खोटी जात सांगितल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. ते धर्माने मुस्लीम आहेत, असा दावा मलिक यांनी केला होता. मात्र, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तसे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे समितीने ही तक्रार फेटाळून लावली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे समीर वानखेडे प्रकाशझोतात आले होते. या प्रकरणातही एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या तपासाविषयी अनेक दोषारोप झाले होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला खोटा असल्याचा आरोप केला होता. यावेळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा दाखला प्रसारमाध्यमांसमोर मांडला होता. वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद आहे. बारकाईनं पाहिल्यास त्यात बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

मुंबईसारख्या ठिकाणी जन्माचे दाखले ऑनलाइन सहज मिळतात. वानखेडेंच्या बहिणीचं सर्टिफिकेट ऑनलाइन उपलब्ध आहे. पण वानखेडे यांचं सर्टिफिकेट ऑनलाइन मिळत नाही. आम्ही रजिस्टर चेक केलं. दीड महिने आम्ही हा कागद शोधत होतो. तेव्हा हे स्कॅन डॉक्युमेंट मिळालं. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. ज्ञानेश्वर वानखेडे जन्मानं दलित आहेत. वाशिममधून त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवलं. त्याच आधारे नोकरी केली. माझगावमध्ये असताना त्यांनी स्वर्गीय झायदा खान यांच्यासोबत लग्न केलं. ते दाऊद खान बनले. दोन मुलांचा जन्म झाला. पूर्ण कुटुंब मुस्लिमाप्रमाणे जगत होतं हे वास्तव आहे. वडिलांच्या आधीच्या कागदपत्राच्या आधारावर समीर वानखेडे यांनी आपली कागदपत्रे तयार केली. बोगस कागदपत्राच्या साह्यानं त्यांनी एका मागासवर्गीय मुलाचा अधिकार हिसकावून घेतला, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.