संजय राऊतांचा भाजपाला इशारा; पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर…
बातमी राजकारण

संजय राऊतांचा भाजपाला इशारा; पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर…

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळत आहे. पत्नी वर्षा राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यात 55 लाखांची ट्रान्सफर कशाकरता करण्यात आली याची चौकशी करण्यासाठी 5 जानेवारीला हजर राहण्याचे ईडीने दिले आहेत. या प्रकरणी आता राज्याचं राजकारण तापू लागल्याचं दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी अनेकवेळा भाजपवर टीका केली आहे. शिवसैनिकांनी ईडीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर भाजप कार्यालय असे पोस्टर्स लावले आहेत. आता संजय राऊत यांनी एक ट्वीट करुन समझनवालोंको इशारा काफी है असं सांगत भाजप नेत्यांना खुलं आव्हान दिलंय.’पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है’, असं संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “माझ्या कुटुंबाला ईडीची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर अचानक गोदी मीडियातले लहान कमळं फुलायला लागली आहेत. या राजकीय पोपटांचा वापर राजकीय कामांसाठी कशा पध्दतीनं केला जातोय हे जनतेला माहीत आहे. माझ्या कुटुंबाचं नाव पीएमसी आणि एचडीआयएल घोटाळ्यामध्ये विनाकरण गोवण्यात आलंय. त्यांना मी आव्हान देतोय की पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है!”

दरम्यान, वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर संतप्त शिवसैनिकांकडून ईडी कार्यालयाबाहेर भाजपाचं बॅनर लावण्यात आलं. या बॅनरनंतर भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेरही ईडी कार्यालय असल्याचं बॅनर लावण्यात आलं. त्या नंतर रात्री उशिरा भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर अशाच स्वरूपाच बॅनर लावण्यात आलं. ते कुणी लावलं हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, शिवसैनिकांनी लावले असावे, असं बोललं जात आहे. भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवर ‘अमलबजावणी संचालनालय’ असं सुरूवातीलाच लिहिलं आहे. त्यानंतर “येथे भाजपाविरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात,” असं लिहिलेलं आहे. या मुद्द्यावरून शिवसेना आणू भाजपामध्ये चांगलाच वाद उफाळून आल्याचे दिसत आहे.