न्यायालायाचा मोठा निर्णय; आयएनएस विराटचे सुटे भाग करण्यास स्थगिती
देश बातमी

न्यायालायाचा मोठा निर्णय; आयएनएस विराटचे सुटे भाग करण्यास स्थगिती

नवी दिल्ली : आयएनएस विराट या युद्धनौकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केंद्र सरकारने युद्धनौकेचे सुटे भाग करून भंगारात विकण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने युद्धनौकेचे सुटे भाग करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जगातील सर्वाधिक काळ सेवा केलेली आणि भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या आयएनएस विराट ही युद्धनौका ८० च्या दशकात भारतीय नौदलाने ६५ दशलक्ष डॉलर्सला विकत घेतली होती, ती १२ मे १९८७ रोजी भारतीय नौदलात सामील करण्यात आली होती. भारतीय नौदलात ३० वर्षे सेवा केलेल्या आयएनएस विराटचे भाग सुटे करण्यासाठी आणि भंगार म्हणून विकण्याचा निर्णय जुलै २०१९ मध्ये नौदलाच्या सल्ल्याने केंद्राने घेतला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.

एन्व्हीटेक मरीन कन्सल्टंट प्रा. लि. या कंपनीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आयएनएस विराट या युद्धनौकेचं डिस्मँटलिंग करण्याला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली ए. एस. बोपण्णा व व्ही. रामसुब्रमण्यम यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय खंठपीठाने हा निर्णय दिला आहे.

आयएनएस विराटचं महत्वं का आहे?
जगात सर्वाधिक काळ सेवा केलेली युद्धनौका अशी आयएनएस विराटची ओळख आहे. ३० वर्षे ती नौदलाच्या सेवेत होती व मार्च २०१७ मध्ये ती सेवेतून बाद करण्यात आली. या युद्धनौकेवर सागरी संग्रहालय करण्याचा प्रस्ताव होता, पण जुलै २०१९ मध्ये नौदलाच्या सल्ल्यानेच ही युद्धनौका मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं. मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशनतर्फे करण्यात आलेल्या लिलावात श्री राम समूहाने ३८.५४ कोटी रुपयांना विकत घेतले होते.

१९८२ मध्ये अर्जेटिना विरुद्धचे फॉकलंड युद्ध रॉयल ब्रिटिश नौदलाने जिंकले त्या वेळी ही विमानवाहू युद्धनौका वापरण्यात आली होती. तिचे वजन २७८०० टन असून ब्रिटनच्या नौदलात तिने सेवा केली. १९५९ ते १९८४ या काळात एचएमएस हर्मीस नावाने ती ओळखली जात होती. नंतर या युद्धनौकेची डागडुजी करुन ती भारतीय नौदलात कार्यान्वित करण्यात आली. ८०च्या दशकात भारतीय नौदलाने ६५ दशलक्ष डॉलर्सला ही युद्धनौका घेतली होती, ती १२ मे १९८७ रोजी भारतीय नौदलात सामील करण्यात आली होती.