ज्येष्ठ काँग्रेस नेते विधानपरिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे निधन
पुणे बातमी

ज्येष्ठ काँग्रेस नेते विधानपरिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे निधन

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. शरद रणपिसे यांच्यावर पुण्यातील जोशी खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गेली चार ते पाच दिवस शरद रणपिसे यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. रणपिसे यांच्या हर्नियाच्या ऑपरेशननंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आमदार शरद रणपिसे यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५१ रोजी पुण्यात झाला होता. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरवात केली. त्यानंतर त्यांनी थेट विधान परिषद गाठली. पुढे त्यांचा प्रवास विधान परिषद आमदार ते विधिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असा राहिला. विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते म्हणून देखील त्यांनी चांगले काम केले.

रणपिसे हे १९७९-८५ या कालावधीत पुणे महापालिकेचे नगरसेवक, तर त्यानंतर १९८३-८४ला गलिच्छ वस्ती निर्मूलन, गृहनिर्माण आणि समाज कल्याण समितीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर १९९४-९५मध्ये ते उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, पुणेचे सदस्य होते.