साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन
पश्चिम महाराष्ट्र बातमी

साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांचे (वय ७२) यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर भिलार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, डी एम बावळेकर, नितीन पाटील, राजूशेठ राजपुरे, विराज शिंदे आदी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाबळेश्वर तालुक्यात एम आर भिलारे यांच्या प्रेरणेने बाळासाहेब भिलारे समाजकारणात व राजकारणात सक्रिय झाले. राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते ते तालुकाध्यक्ष असे पक्षसंघटनेत झोकून देऊन काम केल्याने १९९२ मध्ये जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा निवडून गेले. यानंतर अनेक राजकीय स्थित्यंतरातही सलग सहा वेळा जिल्हापरिषद सदस्यपदी निवडून आले.

डोंगराळ व दुर्गम महाबळेश्वर तालुक्याचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. महाबळेश्वरला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या. कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती केली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पतपुरवठा वाढवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. भिलार व महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उद्योगाला राजमान्यता मिळवून दिली.