आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या मृतांना सीरमकडून मदत; तर आज तीन देशांना पाठवला लसीचा साठा
पुणे बातमी

आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या मृतांना सीरमकडून मदत; तर आज तीन देशांना पाठवला लसीचा साठा

पुणे : ”सर्व सरकारी संस्था आणि लोकांना मी हे निश्चितपणे सांगू शकतो की कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. कोव्हिशिल्डची निर्मिती अनेक इमारतींमध्ये केली जाते. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अशी एखादी घटना घडलीच तर लस सुरक्षित रहावी म्हणून मी मुद्दाम अशाप्रकारची रचना करुन ठेवली आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी ट्विटरवरुन दिली आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुण्यातील मांजरी जवळील सीरम इन्स्टिट्यूटची एक इमारतीला गुरुवारी (ता.२१) आग लागली. या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र, सुदैवाने या आगीमुळे ‘कोव्हिशिल्ड’ लस निर्मितीच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान, देशात १६ जानेवारीपासूनच लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत लाखो लोकांना या लसीचे डोस देण्यात आले आहेत. मात्र विशेष म्हणजे कालच्या अग्नि दुर्घटनेनंतर आज सीरम इन्स्टिट्यूटने म्यानमार, सेशेल्स आणि मॉरिशेस या देशांना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा पाठवला आहे.

त्याचबरोबर आगीत मृत्युमुखी पडलेल्या पाच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सीरम इन्स्टिट्यूटकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांपैकी दोन जण पुण्यातील असून अन्य दोन जण उत्तर प्रदेश व एकजण बिहारमधील आहे. हे सर्वजण कंत्राटी मजूर होते.

“आज SII साठी अत्यंत दु:खद दिवस आहे. आम्हाला अतिशय दुःख झाले आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नियमानुसार या कुटंबांनी जी मदत मिळायची आहे ती मिळेलच, मात्र त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक कुटुंबास २५ लाखांची मदत देत आहोत.” असं सायरस पुनावाला यांनी जाहीर केलं आहे.

आगीच कारण काय?
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील घटनेची माहिती देताना आगीचं नेमकं कारण सांगितलं. MSEZ ३ ला इमारतीला ही आग लागली होती. रोटा व्हायरस प्लांटचं काम येथे सुरु होतं अशी माहिती त्यांनी दिली. वेल्डिंगचं काम सुरु असताना दुपारी २ वाजता आग लागली. वेल्डिंगचं निमित्त होतं मात्र तेथील ज्वलनशील सामानामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.