महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीचे दुप्पट वयाच्या पुरुषासोबत लग्न लावून…
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीचे दुप्पट वयाच्या पुरुषासोबत लग्न लावून…

नगर : नगर जिल्ह्यात अमानुषतेचा कळस गाठणारी घटना समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. येथील एका 13 वर्षीय मुलीचा 24 वर्षीय तरुणासोबत जबरदस्तीने विवाह लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नव्हे तर नवऱ्या मुलानं पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवत तिला जिवंतपणी नरक यातना दिल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईसह आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संबंधित 13 वर्षीय पीडित मुलगी नेवासा फाटा येथील रहिवासी आहे. पीडितेची आई, मावशी आणि काकाने जबरदस्तीने तिचा विवाह एका 24 वर्षीय तरुणासोबत लावून दिला होता. लग्नानंतर पीडित मुलगी 5 सप्टेंबरपर्यंत सासरी राहिली आहे. दरम्यानच्या काळात नवऱ्यासह सासरच्या कुटुंबाकडून पीडितेला नरक यातना दिल्या आहेत. पतीनेही तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले आहेत.

5 सप्टेंबर रोजी आरोपींनी पीडितेला बाहेरची बाधा झाल्याचं कारण देत माहेरी पाठवून दिले. त्यामुळे माहरेच्या कुटुंबानं तिला मांत्रिकाकडे नेलं असता, त्यानेही पीडितेला मारहाण केली आहे. यानंतर पीडित मुलगी नेवासा तालुक्यातील खडका याठिकाणी आजोबांच्या घरी आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. एवढं सर्व रामायण घडेपर्यंत पीडित मुलीच्या आईने याची माहिती आजोबांना देखील दिली नव्हती.

दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीने सर्व प्रकार आपल्या आजोबांना सांगितल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडित मुलीची आई, मावशी व काकासह पती, सासू व सासरे आणि दोन मांत्रिक अशा आठजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.