१९७८साली सोबत आमदार झालेल्या मित्राला पवारांची गावात जाऊन श्रद्धांजली
पुणे बातमी

१९७८साली सोबत आमदार झालेल्या मित्राला पवारांची गावात जाऊन श्रद्धांजली

पुणे : शरद पवार यांनी त्याचे एकेकाळचे सहकारी असलेल्या संपतराव जेधे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली. पुण्याच्या भोर तालुक्यातील शरद पवार यांचे जुने सहकारी संपतराव जेधे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या आंबवडे गावातील ग्रामस्थांची भेट घेऊन संपतरावांच्या निधनाबद्दल शरद पवार यांनी सहवेदना व्यक्त केल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पवार म्हणाले, ‘१९७८ साली संपतराव माझ्यासोबतच आमदार झाले आणि त्यांनी सदैव मला साथ दिली. प्रसिद्धीपासून दूर राहून मला साथ आणि शक्ती देणारे असे जे सहकारी माझ्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिले त्यामध्ये संपतरावांचे स्थान अग्रभागी राहील. सत्ता असो वा नसो त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत मला साथ दिली. त्यांनी सरकारकडे जे काही मागितले ते मतदारांसाठी, जनतेसाठी मागितले. स्वतःसाठी फक्त पंढरपूर मंदिराच्या कमिटीवर नेमण्याची इच्छा व्यक्त केली. तिथे पांडुरंगाची आणि उन्हातान्हात पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी, ही त्यांची मनोमन इच्छा होती, असे यावेळी शरद पवार यांनी सांगितले.

अशी निस्वार्थी, जिवाभावाची माणसे हा आपला ठेवा असतात, संपतरावांच्या रूपाने हा ठेवा गेल्याचं मला दु:ख आहे. गावकऱ्यांना एवढेच सांगणे आहे की संपतरावाच्या कुटुंबाची त्यांनी काळजी घ्यावी. काहीही अडचणी आल्यास मला कळवावे, मी त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असेन अशी ग्वाही यावेळी पवारांनी दिली आहे.