बातमी विदेश

धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पत्राद्वारे विषप्रयोगाचा प्रयत्न

वॉशिंग्टन :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरूद्ध एक मोठे षडयंत्र सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विषयुक्त पत्र पाठविण्यात आले होते. मात्र सुरक्षा यंत्रणांनी वेळीच याची पडताळणी केल्यामुळे त्यांच्यावरील हा विषप्रयोगाचा हा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही.  जेव्हा सुरक्षा यंत्रणांना या पत्रावर संशय आला तेव्हा त्यांनी या पत्राची तपासणी केली. या तपासणीत या पत्रात रिसिन नावाचा एक विषारी पदार्थ सापडला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

व्हाईट हाऊसमध्ये येण्यापूर्वी सर्व लिफाफ्यांची रीतसर तपासणी केली जाते. यात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास ती लगेच वेगळी केली जाते. यावेळी आलेल्या पत्रांमध्ये हे संशयास्पद पत्र लक्षात येताच ते लगेच प्रयोगशाळेत (लॅब) पाठविण्यात आले. प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात या पत्रात रीसिन नावाचा विषारी पदार्थ आढळून आला.

रीसिन हा अत्यंत विषारी पदार्थ असून याचा वापर दहशतवादी हल्ल्यांमध्ये केला जातो. याचा उपयोग पावडर, धूर किंवा अॅसिड म्हणून केला जाऊ शकतो. या विषामुळे पोट आणि आतड्यांमधून रक्तस्त्राव होतो. या विषामुळे यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंड निकामी होतात आणि त्या संबधित व्यक्तीचा मृत्यू होतो. प्राथमिक  तपासात हे पत्र कॅनडाहून पाठविण्यात आले होते. सध्या या प्रकरणाचा तपास एफबीआय आणि गुप्त यंत्रणा करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत