दुकानांच्या वेळा ८ वाजेपर्यंत; मुंबई लोकल बंदच! मुख्यमंत्र्यांची घोषणा
बातमी महाराष्ट्र

दुकानांच्या वेळा ८ वाजेपर्यंत; मुंबई लोकल बंदच! मुख्यमंत्र्यांची घोषणा

सांगली : राज्यात दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच, मुंबई लोकलबाबत मात्र मुख्यमंत्र्यांनी काहीच घोषणा न केल्याने लोकल बंदच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील जनतेच्या हिताची आपल्याला काळजी असून व्यापाऱ्यांच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सांगली दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील जनतेला लॉकडाऊनमधून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत असून राज्यातील दुकानं रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. ज्या भागात कोरोना रुग्णांची टक्केवारी कमी आहे, त्या भागात हा निर्णय लागू होणार आहे. ज्या भागात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे मात्र निर्बंध कायम राहतील, असं त्यांनी सांगितलं. खासगी कार्यालयांनी कामाच्या वेळात बदल करून वेगवेगळ्या वेळेला कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट लावाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या, एकाच वेळी कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

दुकानांच्या वेळा वाढवल्या नाहीत, तर कायदा मोडून दुकानं सुरु ठेऊ, अशी भूमिका पुण्यासह राज्यातील काही व्यापारी संघटनांनी घेतली होती. त्यावर आपण व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नसून जनतेच्या हिताची आपल्याला अधिक काळजी असल्याचं ते म्हणाले. मात्र, त्याचवेळी राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना कमी आहे, अशा जिल्ह्यांतील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवायला परवानगी मिळणार असल्याचं ते म्हणाले.