धक्कादायक! पालघरमध्ये ६ दिवसाच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू
बातमी मुंबई

धक्कादायक! पालघरमध्ये ६ दिवसाच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

पालघर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका मात्र कायम आहे. अशात पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा दिवसीय कोरोनाबाधित बाळाला वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागले आहेत. इतकंच नाही तर यासाठी बाळाच्या आई-वडील आणि नातेवाईकांना तीन रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागले. या घटनेनंतर नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पालघर जिल्ह्यातील सफाळ्यात असलेल्या एका खासगी रुग्णालयात ३१ मे रोजी एका बाळाचा जन्म झाला. बाळाची मूदतपूर्व प्रसूती असल्याने त्याचं वजन कमी होतं. त्यामुळे त्याला चांगल्या उपचारासाठी पालघरमधील एका रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिथे गेल्यानंतर बाळाची आई आणि बाळाची करोना अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्या रिपोर्टमध्ये आईचा रिपोर्ट निगेटीव्ह, तर बाळाचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला.

त्यांनंतर त्यांना तात्काळ पालघरमधील ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आलं. मात्र तिथेही योग्य सुविधा नसल्याने पुढील उपचारासाठी जव्हार येथील रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र यात बाळाची प्रकृती खालावत गेली. जव्हारमध्येही वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याने तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करणयात आलं. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी ६ दिवसांच्या बाळाने अखेरचा श्वास घेतला. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.