पश्चिम महाराष्ट्र बातमी

वाळू वाहतुकीच्या टेम्पोने चिरडल्याने पोलिसाचा जागेवरच मृत्यू

सोलापूर : वाळूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने इशारा करूनही न थांबता, उलट पोलीस शिपायाला चिरडल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीजवळ सोलापूर रस्त्यांवर शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. यात तो पोलीस शिपाई गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गणेश प्रभू सोनलकर (वय ३२) असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. दरम्यान, पोलीस शिपायाला चिरडल्यानंतर वाळू वाहतुकीचा टेम्पो जागेवर न थांबता तसाच सुसाट वेगाने निघून गेला. मृत सोनलकर हे लोक अदालतीसाठी संबंधित व्यक्तींना समन्स बजावत गोणेवाडी येथे आले होते. तेथे स्थानिक पोलीस पाटलाची वाट थांबले असताना तेथून अचानकपणे वाळू वाहतुकीचा टेम्पो जात होता. तेव्हा नजर पडताच सोनलकर यांनी तत्परतेने पुढे येऊन तो टेम्पो अडविण्याचा इशारा केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत टेम्पो तसाच पुढे जात असताना सोनलकर हे पुढे जाऊ लागले. तेव्हा टेम्पोचालकाने सोनलकर यांच्या अंगावर वाहन चालवले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पळून गेलेल्या चालकाचा शोध मंगळवेढा पोलीस घेत आहेत.