न्यायालयाकडून सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी
बातमी मुंबई

न्यायालयाकडून सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं असताना एनआय कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यावेळी कोर्टाने सीबीआयला सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली असून चौकशी करण्यासाठी वेळेचं नियोजन करा असं कोर्टाने सीबीआयला सांगितलं आहे. त्याचबरोबर, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे यांना २१ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अंबानी यांच्या घराजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूवातील सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं. स्फोटकं प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. यानंतर प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते. स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असताना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे सोपवला होता.

दरम्यान, दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू असताना एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएच्या पथकाने सचिन वाझे यांना अटक केली. अटक करण्यात आल्यानंतर वाझेंना एनआयए न्यायालयसमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने वाझे यांची २५ मार्चपर्यंत आणि नंतर ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत रवानगी केली होती.