नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर
बातमी महाराष्ट्र

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी राज्य सरकारने नवरात्रोत्सवासाठी सोमवारी नियमावली जाहीर केली आहे. गेल्यावर्षांप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार तर घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. यावेळी ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवासाठी सरकार सज्ज झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नवरात्रीत गरबा किंवा दांडीया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गदी करुन उत्सव साजरा करू नये अशा सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना लागू करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून यासाठी ऑनलाइन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येत आहे. पालिकेने निश्चित केलेल्या आकारमानानुसारच मंडप परवानगी दिली जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करता मूर्ती शाडूची असावी, सजावट पर्यावरणपूरक असावी, सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार फूट उंचीची, तर घरगुती मूर्ती दोन फूट उंचीची असणेही आवश्यक आहे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची व्यवस्था करावी.