अनोळखी नंबरचा Video Call रिसिव्ह करण्याआधी १० वेळा विचार करा, असू शकतो Sextortion चा प्रकार
बातमी मुंबई

अनोळखी नंबरचा Video Call रिसिव्ह करण्याआधी १० वेळा विचार करा, असू शकतो Sextortion चा प्रकार

वाढत्या डिजिटलायझेशनचा जसा फायदा झाला आहे. तसे, यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. आजकाल रोज नव-नवीन घटना कानावर येतच असतात. तुम्हीही अनेक प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीबद्दल ऐकले असेल. परंतु, सध्या चर्चेत असलेला सेक्सटॉर्शनचा प्रकार अनेकांसाठी नवीन आहे. राजस्थानच्या एका खेडेगावात सेक्सटॉर्शनचा हा सगळा प्रकार सुरू आहे. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळल्याची धक्कादायक माहिती देखील यात समोर आली आहे. पण, सेक्सटॉर्शन म्हणजे काय आणि याचा ऑनलाईन प्रकाराशी काय संबंध आहे. तसेच, यापासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे आणि सध्या हा विषय इतक्या चर्चेत का आला आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ही विशेष माहिती तुमच्यासाठीच. सर्वात महत्वाचे म्हणजे जर तुम्ही आजकाल सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह राहत असाल तर खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सेक्सटॉर्शन म्हणजे काय?
गेल्या काही काळात WhatsApp वर अनोळखी Video Calls ची अनेक प्रकरणे समोर आली आहेत आहेत. या प्रकरणात एखादी व्यक्ती फ्रॉड्सच्या जाळ्यात अडकताच कॉलच्या दुसऱ्या टोकाला बसलेली व्यक्ती युजरचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवते. काही प्रकरणांमध्ये, युजर्सच्या फोटोजच्या मदतीने एक मॉर्फ व्हिडिओ तयार केला जातो. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केले जाते. स्कॅमर्स व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतात. अशात अनेक जण हे प्रकरण कसे बसे संपविण्यासाठी पूर्ण प्रयत्न देखील करतात. पण, कुणी पैसे दिले तरी ब्लॅकमेलिंगचा हा टप्पा इथेच संपत नाही. तर, पुढे वाढत जातो याच संपूर्ण प्रकाराला सेक्सटॉर्शन म्हणतात.

ब्लॅकमेल करून देतात त्रास:
नुकतचं असे एक प्रकरण समोर आले आहे. पुणे पोलिसांनी राजस्थानमधून एका २९ वर्षीय तरुणाला अटक केली असून या व्यक्तीला सेक्सटॉर्शन प्रकरणी अटक करण्यात आली आहे . पुण्यात एका १९ वर्षीय तरुणाने कथित लैंगिक शोषणामुळे आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रॉडस्टर्स पीडित व्यक्तीला सतत ब्लॅकमेल करून त्रास देत होते. या तरुणाने २८ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. सेक्सटोर्शनशी संबंधित या प्रकरणात तरुणाने याआधी फसवणूक करणाऱ्यांना ४५०० रुपये दिले होते. पण, ब्लॅकमेलिंगची प्रक्रिया इथेच थांबली नाही.

असे होते प्लानिंग:
अशा प्रकरणात सायबर गुन्हेगारांचे टार्गेट सहसा पुरुष असतात. पुरुषांना लक्ष्य करण्यासाठी महिलांचा वापर करतात. अधिकारी सांगतात की, अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगार इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर आपले टार्गेट शोधतात. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी आकर्षक डीपीचा वापर केला जातो. सायबर पोलिसांनी लोकांना अनोळखी व्हिडिओ कॉल्स आणि इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अज्ञात लोकांशी होत असलेलया संभाषणांबाबत चेतावणी दिली आहे. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहण्याऱ्या यूजर्सने कायम सावध राहणे देखील आवश्यक आहे. अन्यथा खूप मोठे नुकसान होऊ शकते.

असे घडल्यास तुम्ही काय करावे ?
अशा बहुतांश घटनांमध्ये बदनामीच्या भीतीने लोक कोणाशीही बोलत नाहीत. अगदी कमी प्रकरणे अगदी पोलिसांपर्यंत पोहोचतात. मॉर्फ सेक्स व्हिडीओमध्ये एखाद्या व्यक्तीचे फोटो येताच त्या व्यक्तीला काहीही करून त्यातून बाहेर पडायचे असते. त्यासाठी ते वाट्टेल तितके पैसे द्यायला तयार होतात आणि येथेच व्यक्ती घोटाळेबाजांच्या जाळ्यात अडकतात. काही लोक तर इतके घाबरतात की ते त्यांचे Social Media Account डिलीटही करतात. हॅकर्सना याची कल्पना असते. ते त्याचाच फायदा घेतात.

पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती द्या:
जर तुम्हीही अशा प्रकरणात अडकलात तर सर्वप्रथम स्वतःला शांत ठेवा.अशा कोणत्याही केसपासून स्वतःला वाचवण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सर्व प्रथम, कोणत्याही Unknown Video Call किंवा प्रोफाइलमध्ये अडकू नका. शक्य तेवढे दूर राहा. अशी घटना तुमच्यासोबत जर घडली तर, पैसे देण्याच्या नादात पडू नका. उलट पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती द्या आणि ब्लॅकमेलिंगच्या येणाऱ्या कॉलला उत्तर देऊ नका, त्यांना ब्लॉक करा. केवळ तुमची सावधगिरी तुम्हाला फसवणूक करणाऱ्यांपासून वाचवू शकते.