कोव्हिशिल्ड लसीचा साठा मुंबईत दाखल; लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ लवकरच
बातमी मुंबई

कोव्हिशिल्ड लसीचा साठा मुंबईत दाखल; लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ लवकरच

भारतात कोरोना लसीकरणासाठी मंगळवारी पुण्यातील सीरम इन्स्टियूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लस वितरणासाठी देशभरात रवाना करण्यात आली. दरम्यान आज सकाळी ५.३० वाजता १ लाख ३९ हजार ५०० लसीच्या कुप्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात पोहोचल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१६ जानेवारी २०२१ पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे १,३९,५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. मुंबईमधील लोकसंख्या पाहता महापालिकेच्या शाळांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत्यामुळे अखेरच्या टप्प्यात गरज भासली तरच पालिका शाळांध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.

मुंबई प्रशासनाने प्राथमिक स्तरावर आठ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रांची उभारणी करण्याची घोषणा केली होती. या आठ केंद्रांमध्ये प्रतिदिन १२ हजार जणांना करोनाची लस देण्याचे नियोजन होतं. त्यानंतर पालिका रुग्णालयं, सलग्न रुग्णालयं, दवाखाने, जम्बो करोना केंद्र आदी ७५ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याचे प्रशासनाने निश्चित केले. त्या दृष्टीने आखणी सुरू केली असून या केंद्रांमध्ये प्रतिदिन ५० हजार नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे. मुंबईतील लोकसंख्येने दीड कोटीचा आकडा पार केला आहे. उपलब्ध होणारी लस कमी काळात अधिकाधिक व्यक्तींना देण्याचा मानस आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.

तथापि, कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला सुरुवात होण्याच्या चार दिवस आधी कोव्हिशिल्ड लसीची पहिली बॅच मंगळवारी (12 जानेवारी) 13 शहरांमध्ये पाठवण्यात आली. कोविशील्ड लसीचे 54.72 लाख डोस काल दुपारी चार वाजेपर्यंत पोहोचवण्यात आले. 14 जानेवारीपर्यंत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून 1.1 कोटी आणि भारत बायोटेककडून 55 लाख डोस मिळतील.