रिपब्लिकन पक्षाच्या सुनीता वाडेकर पुण्याच्या नव्या उपमहापौर
पुणे बातमी

रिपब्लिकन पक्षाच्या सुनीता वाडेकर पुण्याच्या नव्या उपमहापौर

पुणे : पुण्याच्या उपमहापौर स्वाती शेंडगे यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या गाजी आता रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेविका सुनिता वाडेकर यांची नियुक्ती झाली आहे. भाजपा आणि आरपीआयकडून लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाईल. स्वाती शेंडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपमहापौरपद सुनीता वाडेकर यांना देणार असल्याचे आरपीआयने आधीच निश्चित केले होते. याबाबत आरपीआयच्या अंतर्गत बैठकीत वाडेकर यांच्या नावावर एक मुखाने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे उपमहापौर पदाच्या निवडणुकीची केवळ औपचारिकताच बाकी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद भाजपकडेच राहणार, की आरपीआयला दिले जाणार? यावर खल सुरू होता मात्र, आरपीआयने हे पद आपल्याकडेच राहावे, यासाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली होती आणि त्याला यश मिळाले आहे. भाजप उपमहापौरपद आरपीआयला द्यायला राजी झाले आहे. उपमहापौपद आरपीआयला देऊ नये, असाही एक मतप्रवाह भारतीय जनता पक्षात स्थानिक पातळीवर होता. मात्र स्थानिक पातळीवरील हे मत वरिष्ठ पातळीवर मात्र फारसे तग धरू शकले नाही, म्हणूनच आधी आरपीआयकडे असलेले उपमहापौरपद पुन्हा आरपीआयलाच देण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला.

दरम्यान, सव्वा वर्षासाठी हे पद असेल असे त्यावेळी भाजपच्या तत्कालीन शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर हे पद रिपाईला देण्याचे ठरले होते. त्यानुसार शेंडगे यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर रिपाईकडून उपमहापौरपदाची मागणी केली होती. त्यासाठी रिपाईने गटनेत्या सुनिता वाडेकर यांचे नावही निश्चित केले. मात्र, भाजपने उपमहापौर शेंडगेचा राजीनामा घेणे टाळले होते.

स्थानिक पातळीवर भाजपामध्ये असलेल्या दोन मतप्रवाहमुळे यावर निर्णय होऊ शकला नव्हता. मात्र आता निवडणुकांसाठी केवळ दहा महिन्यांचा कालावधी उरल्यामुळे यावर निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसारच शेंडगे यांनी राजीनामा दिला आहे. सुनिता वाडेकर या आरपीआयच्या नगरसेविका असून त्या आरपीआय गटाच्या विद्यमान गटनेत्या ही आहेत. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या बातमीला आरपीआयच्या वरिष्ठ सुत्रांनीही दुजोरा दिला आहे. ही निवड एकमताने झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

भाजपला गेल्या महापालिका निवडणुकीच्या निवडणुकीत मिळालेल्या यशात आरपीआयचाही वाटा होता. आरपीआयचे केवळ पाच नगरसेवक निवडून आले असले, तरी शहरातील विविध मतदारसंघात आरपीआय फॅक्टर भाजपसाठी यश देणारा ठरला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीतही या फॅक्टरचा फायदा होईल अशी भाजपला आशा आहे. भाजपने आरपीआयला पुन्हा उपमहापौर देण्याच्या घेतलेल्या या भूमिकेचा आगामी महापालिका निवडणुकीत कसा फायदा होणार, हेही पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.