बॅनरवर सुषमा अंधारेंचा फोटो पाहून म्हणाला ही माझी बहीण; १८ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला भाऊ सापडला
बातमी मुंबई

बॅनरवर सुषमा अंधारेंचा फोटो पाहून म्हणाला ही माझी बहीण; १८ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला भाऊ सापडला

मुंबई : शिवसेनेच्या उप नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांचा बॅनरवरील फोटो पाहून त्यांचा १८ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला भाऊ त्यांना सापडला आहे. सुषमा अंधारे यांनी आपला भाऊ सापडल्याची भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्ट खालील प्रमाणे

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तुमच्या दृष्टीने सगळ्यात वाईट आणी जीवघेणं काय असेल..?
मला वाटतं कुणीतरी येण्याची वाट बघणं… त्याच्या वाटेकडे डोळे लावून बघणं… काही तास.. दिवस.. आठवडे.. महिने नाही तर वर्षानुवर्ष वाट बघत राहणं.. अंतहीन.. अमर्याद.. अनिवार.. फक्त आणि फक्त त्या वाटेकडे डोळे लावून बसणं..
… माझ्या कुटुंबाने अशी तब्बल अशी अनिवार अंतिम आणि अमर्याद वाट पाहिली.. शक्य ते सगळे प्रयत्न केले..

पण काल अचानक नियतीला हि आमचं हे वाट बघत राहणं बघून जणू पान्हा फुटला.
आमचं संयुक्त कुटुंब आहे कुटुंबात तब्बल 48 माणसं आहेत. तब्बल 18 वर्षांपूर्वी आमचा भाऊ घरातून कुणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेला सुरुवातीला दोन-तीन दिवस तू कुठेतरी गेला असेल परत येईल असं वाटलं. अनेक ठिकाणी चौकशी केली. टीव्ही किंवा वर्तमानपत्रात हरवल्याची जाहिरात दिली तर त्याच्या जीवाला धोका होईल का अशी एक भाबडी भीती कुटुंबीयांना वाटत होती महिने उलटून गेले वर्ष उलटली पण तो काही परत आलाच नाही.

मध्ये दोन-तीन वेळा तो वेगवेगळ्या ठिकाणी असण्याची माहिती मिळाली कधी पुण्याचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या मदतीने त्याला सासवडमध्ये शोधायला आम्ही गेलो, तर कधी वाघोली खराडी पुणे स्टेशन किंवा कधी राज्याच्या बाहेर.. पण त्याचा काही पत्ता लागला नाही.
परवा दिवशी गोरेगाव मध्ये शिव संवाद यात्रेची सभा झाली आणि बांद्रापासून गोरेगाव पर्यंत दूतर्फा सभेच्या निमित्ताने बॅनर्स झळकले.

कसे कुठून त्याच्या नजरेला हे बॅनर्स पडले आणि ही बॅनर वर असणारी व्यक्ती माझी बहीण आहे हे त्याने त्याच्या जवळच्या व्यक्तीला सांगितले. पण त्याच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार आणि विश्वास ठेवला तरी संपर्क कसा होणार. कारण घरातला जुना लँडलाईन नंबर आता इतिहासजमा झालाय.. फेसबुक आणि इतरत्र माझा संपर्क क्रमांक शोधायला सुरुवात झाली आणि मित्र यादीमध्ये माझा दुसरा भाऊ धनराज याच्या फेसबुक पोस्टवर संपर्क क्रमांक त्याला मिळाला.

त्याने स्वतःहून काल फोन केला. बारामतीचा मेळावा आटोपून पाच वाजता मी परतताना त्याचा फोन धडकला. मी मुंबईत आहे असे सांगितले. आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये मुंबईकडे निघालो. पण नंतर मात्र फोन अचानक बंद झाला. वेगवेगळ्या शंका मनात येत होत्या अशा वेळेला मदतीला कोण असेल ? आणि जेव्हा कधी मदत मागायची कोणाला असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याचं उत्तर म्हणून एकच नाव पुढे असतं ते म्हणजे माननीय आमदार सचिन भाऊ आहिर.

भाऊंना फोन केला . ज्या नंबर वरून त्याचा फोन आला होता लोकेशन ट्रॅक केलं. माहीम कोळीवाडा किंवा बांद्रे परिसरामध्ये मदत हवी आहे म्हटलं आणि भाऊंनी तात्काळ युवा सेनेच्या सगळ्या टीमला सांगितलं.

युवासेना उपसचिव जय सरपोतदार अरुण कांबळे ही मंडळी तात्काळ आपल्या टीम सह येऊन दाखल झाले राहुल कनाल यांनीही फोनवरून प्रत्येक गोष्टीचा आढावा घेणे सुरू ठेवला.
साडेनऊ वाजता सुरू झालेले शोध मोहीम रात्री दीड वाजता थांबली माहीम कोळीवाडा बांद्रे पश्चिम जामा मस्जिद लिंक रोड के सी मार्ग फायर कॅम्प अक्षयच्या इंदुरकर आणि काल रात्री दीड वाजता आम्हाला अठरा वर्षांपूर्वी आमच्यापासून दुरावलेला भाऊ मिळाला.

जय सरपोतदार – विभाग अधिकारी उपसचिव युवासेना, अरुण कांबळे-विधानसभा चिटणीस, नरेश मिस्त्री-उपविभाग अधिकारी, सागर राणे- विधानसभा समन्वयक, श्वेतांग तांबे विधानसभा समन्वयक राज मोडक शाखा अधिकारी जगदीश राघव शाखा अधिकारी सिद्धेश जाधव शाखा समन्वयक आनंद फुले उपशाखाप्रमुख निखिल डहाळे युवा सैनिक गौरव मोरे युवा सैनिक परेश युवासैनिक आणि विशेषतः सचिन भाऊ आहेर यांचे माझे संपूर्ण कुटुंबीय कायम ऋणी असेल.