दानिश सिद्दीकीच्या हत्येमागे आमचा हात नाही, तालिबानकडून खेद व्यक्त
बातमी विदेश

दानिश सिद्दीकीच्या हत्येमागे आमचा हात नाही, तालिबानकडून खेद व्यक्त

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात भारतीय पत्रकार – छायाचित्रकार दानिश सिद्दीकी याचा नुकताच मृत्यू झाला आहे. दानिशच्या मृत्यूवर पहिल्यांदाच तालिबानची भूमिका समोर आली असून तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद यानं एका टीव्ही चॅनलशी बोलताना, तालिबानचा दानिशच्या हत्येमागे कोणताही हात नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दानिश सिद्दीकी याचं पार्थिव शरीर ‘इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस’ला सोपवण्यात आलं आहे. याची सूचना भारताला देण्यात आल्यानंतर भारतीय अधिकारी मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कंदहारच्या ‘स्पीन बोल्डक’ जिल्ह्यात अफगाण सैन्य – तालिबानमध्ये झालेल्या चकमकी दरम्यान दानिशचा मृत्यू झाला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दानिशच्या मृत्यूवर व्यक्त केला खेद
‘गोळीबारात एखाद्या भारतीय पत्रकाराचा मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. त्याचा मृत्यू कसा झाला याचादेखील आम्हाला पत्ता नाही. युद्ध क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही पत्रकारानं आम्हाला या बाबतीत सूचना दिली तर आम्ही त्या व्यक्तीची खास काळजी घेऊ’, असं तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिदनं यानं’सीएनएन-न्यूज १८’शी बोलताना म्हटलंय. सोबतच, तालिबाननं दानिशच्या मृत्यूवर खेद व्यक्त केला आहे. ‘आम्हाला भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी याच्या मृत्यूचा खेद आहे. आम्हाला या गोष्टीचं दु:ख होतंय की कोणतीही माहिती न देता पत्रकार युद्ध क्षेत्रात प्रवेश करत आहेत’, असंही मुजाहिद यानं म्हटलं आहे.

दानिश सिद्दीकी याचा मृत्यू
पुलित्झर पुरस्कार विजेता छायाचित्रकार आणि पत्रकार दानिश सिद्दीकी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेसाठी काम करत होता. अफगाण सैन्याच्या कमांडरनं वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ला दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या ‘स्पीन बोल्डक’ या भागावर तालिबाननं कब्जा मिळवला होता. अफगाण स्पेशल फोर्सची या भागातील मुख्य बाजार ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू होती. याच दरम्यान तालिबानकडून करण्यात आलेल्या क्रॉस फायरिंग दरम्यान दानिश सिद्दीकी आणि एका वरिष्ठ अफगाण अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.