पंढरपूर पोटनिवडणुकीनं अख्खं कुटुंब संपवलं? शिक्षकासह घरातील चौघांचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र बातमी

पंढरपूर पोटनिवडणुकीनं अख्खं कुटुंब संपवलं? शिक्षकासह घरातील चौघांचा मृत्यू

पंढरपूर : इलेक्शन ड्यूटिला गेलेल्या शिक्षकासह कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. सांगोला तालुक्यातील घेर्डी इथले प्रमोद माने हे कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गात इलेक्शन ड्यूटिला होते. प्रमोद माने हे शिक्षक आहेत. पण लॉकडाऊनमुळे त्यांना इलेक्शन ड्यूटिला जावं लागलं. यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. पंढरपूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण तब्येत आणखी खालावल्याने त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईतही प्रमोद यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. अखेर त्यांची करोनाशी झुंज संपली आणि मृत्यू झाला. या सगळ्यात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्यांच्या घरात पत्नी, मुलगा, आई, वडील आणि मावशी यांनाही लागण झाल्यानं सगळ्यांवर उपचार सुरू होते. पण कोरोनाच्या या संसर्गापुढे आरोग्य व्यवस्था अपुरी आहे. माने यांच्या कुटुंबातील सगळ्यांचाच मृत्यू झाला.

कोरोनाच्या या आजारामुळे संपूर्ण कुटुंब संपलं खरं पण यात पंढरपूर पोटनिवडणूकही कारण ठरली असल्याची चर्चा आहे. आधीच हा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यात निवडणुकांच्या कामासाठी वारंवार होणाऱ्या बैठका, नेत्यांचे दौरे आणि भेटीगाठी वाढल्याने तो आणखी बळावला. त्यात निवडणुकीचं काम म्हटलं की गर्दी आलीच. यावेळी सर्रासपणे कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडवण्यात आला. त्यामुळे धोका आणखी वाढला. माने यांच्या कुटुंबातील करता पुरूष गेला. त्यामागे संपूर्ण कुटुंब संपल्यामुळे परिवारातील इतरांना दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण गावात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.