कोरोना लस मोफत मिळणार नाही; आरोग्यमंत्र्यांचा मोफत लसीच्या घोषणेवरून घुमजाव
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

कोरोना लस मोफत मिळणार नाही; आरोग्यमंत्र्यांचा मोफत लसीच्या घोषणेवरून घुमजाव

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचे सांगत सुखद धक्का दिला. मात्र काही वेळातच त्यांनी या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत आरोग्यमंत्र्यांनी त्या घोषणेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशभरात कोविड १९ लसीकरणाची सराव फेरी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ड्राय रनचा आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी फक्त दिल्लीतच नाही, तर देशभरात करोनाची लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत सुखद धक्का दिला. केंद्राकडून झालेल्या घोषणंच स्वागत होत असतानाच केंद्रीय मंत्र्यांनी पुढच्याच क्षणी घुमजाव केलं.

देशभरात  मोफत लस दिली जाणार असल्याचं वृत्त सगळीकडे पसरल्यानंतर आरोग्य मोफत लसीच्या घोषणेवर खुलासा करत सारवासारव केली. “देशभरात लस पुरवली जाणार असून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस मोफत दिली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी व २ कोटी कोविड काळात पहिल्या फळीत काम करणाऱ्यांना लस देण्यात प्राधान्य दिलं जाणार आहे.

प्राधान्यक्रमातील २७ कोटी लाभार्थ्यांना लस कशी दिली जाईल, याचा तपशील जुलैपर्यंत निश्चित केला जाणार आहे,” असं सांगत आरोग्यमंत्र्यांनी मोफत लसीच्या घोषणेवर सारवासारव केली.
तसेच, “देशातील नागरिकांना मी आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका.

सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमता याची खात्री करणे, याला आमचं प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे,” असं सांगत आरोग्यमंत्र्यानी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. देशभरात ड्राय रन केलं जात आहे. याच दरम्यान मात्र, काही वेळातच त्यांनी सगळ्यांना मोफत लस दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.