मराठा आरक्षणप्रकरणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणप्रकरणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण प्रकरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण प्रकरणी २५ जानेवारी पासून सर्वोच्च न्यायालयात सुरु होणारी अंतिम सुनावणी आजपासूनच सुरु होत आहे. मागील सुनावणी वेळी न्यायालयानं मराठा आरक्षणावरील स्थगित हटवण्यास नकार देत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती अब्दुल नजीर, न्यायमूर्ती रवींद्र भट, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, यांच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर सुनावणी होणार आहे. राज्याच्या अनुषंगानं आणि ठाकरे सरकारच्या दृष्टीनं हा मुद्दा महत्त्वाचा असल्याने संपूर्ण राज्याच या सुनावणीकडं लक्ष लागलं आहे.

मागील सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारनं हे प्रकरण पाच सदस्यीय घटनांपीठाकडे वर्ग करण्यासाबोतच आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. मात्र, ९ डिसेंबरला झालेल्या सुनावणीतही न्यायालयानं आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला. त्याचबरोबर, २५ जानेवारीपासून मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असं सांगितलं होतं. मात्र, आजपासूनच या प्रकरणावर सुनावणी सुरू होत आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती उठवण्यास नकार देण्यात आल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची राज्य सरकारकडून अंमलबजावणीही करण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाला दिलासा देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला होता.