धक्कादायक ! यवतमाळमध्ये गर्भवती वाघिणीला जाळलं जिवंत
बातमी विदर्भ

धक्कादायक ! यवतमाळमध्ये गर्भवती वाघिणीला जाळलं जिवंत

यवतमाळ : गर्भवती वाघिणीला नखांसाठी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी सकाळी घडली आहे. या वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेले. सुमारे महिनाभरापूर्वी झरी तालुक्यात देखील वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यवतमाळ जिल्ह्यात एकाच महिन्यात दोन वाघांच्या शिकारी उघडकीस आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पांढरकवडा वन विभागाअंर्गत मुकु टबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र. ३० मध्ये सकाळी गस्तीदरम्यान वनरक्षकाला वाघिणीचा मृतदेह आढळून आला. याठिकाणी नाल्याला लागूनच एक गुहा आहे आणि या गुहेचा वापर ही वाघीण करत होती. गुहेचे प्रवेशद्वार अतिशय छोटे आहे. स्थानिक शिकाऱ्यांनी हे पाहिले असेल आणि वाघिणीला गुहेत अडकवून ठेवण्यासाठी बांबू आणि इतर साहित्यासह त्यांनी गुहेच्या प्रवेशद्वारावर आग लावली. ती वाघीण मेली आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी तीक्ष्ण हत्यारांनी तिच्या शरीरावर जखमा केल्या. ती मेल्याची खात्री केल्यानंतर तिचे दोन्ही पंजे कापून नेले, असल्याची ही माहिती वनरक्षकाने माहिती वरिष्ठांना दिली आहे. यावेळी विभागीय वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी सुमारे चार वर्षीय वाघिणीच्या गळ्यात ताराचा फास अडकलेला दिसून आला. परिसरात बांबूच्या काड्या, क्लच वायर आणि जाळल्याच्या खुणा आढळून आल्या.

गर्भवती वाघिणीच्या पोटात चार बछडे होते. आरोपींचा शोध सुरू असल्याचे संबंधित वनाधिकाऱ्यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील वाघाच्या मृत्यूची एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे. या दोन्ही घटनेत वाघाची शिकार झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात या जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली असून सहज व्याघ्रदर्शन होत आहे. विशेष म्हणजे २२ नोव्हेंबरला उमरेड-करांडला अभयारण्यात देखील गर्भवती वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या वाघिणीच्या पोटात देखील चार बछडे होते.