देश बातमी

दोन हजार रुपयांची नोट बंद होणार?

नवी दिल्ली : ”दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा कोणताही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. कोणत्याही चलनी नोटा बंद करण्यापूर्वी केंद्रसरकार सर्वात आधी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेते. त्यानंतरच नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला जातो.” अशी माहिती काल लोकसभेत अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ”आर्थिक वर्ष 2019-20 आणि 2020-21 मध्ये 2000 रुपयांच्या नोटा पाठविण्यासाठी प्रेसला मागणी पत्र पाठविण्यात आले नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की सरकार 2000 रुपयांच्या नोटांचे मुद्रण बंद करण्याचा विचार करीत आहे. 31 मार्च 2020 पर्यंत 2000 रुपयांच्या 27,398 नोटा चलनात आल्या आहेत. 31 मार्च 2019 पर्यंत ही आकडेवारी 32,910 चलन नोटा होती. ते पुढे म्हणाले की कोविड -19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नोटांचे मुद्रण काही काळ थांबले होते. तथापि, या मुद्रण केंद्रात टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्यात आले आहे.

तसेच, ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोट प्रिंटिंग प्रायव्हेट लिमिटेड (बीआरबीएनएमपीएल) मध्ये 23 मार्च 2020 ते 3 मे 2020 पर्यंत नोटांचे मुद्रण थांबविण्यात आले होते. 4 मेपासून येथे काम सुरू झाले. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसपीएमसीआयएल) मध्ये नोटांची छपाई काही काळ बंद होती. लॉकडाऊन दरम्यान एसपीएमसीआयएलच्या नाशिक व देवास येथील प्रेसदेखील काही काळ बंद होत्या.’ असेही अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत