एक कॉल अन् पुणेकरांच्या आयुष्याची वाट; १३०० किमीवरचं एक अख्खं गाव तरुणांच्या जीवाशी खेळतंय
पुणे बातमी

एक कॉल अन् पुणेकरांच्या आयुष्याची वाट; १३०० किमीवरचं एक अख्खं गाव तरुणांच्या जीवाशी खेळतंय

जयपूर : सायबर गुन्हेगारीचा एक भाग असलेल्या ‘सेक्स्टॉर्शन’चा विळखा आता अगदी आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचला आहे. या ‘सेक्स्टॉर्शन’मुळे सप्टेंबरमध्ये पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली. या घटनांचा तपास करत पुणे पोलिस पोहोचले थेट राजस्थानमधील गोठरी गुरू या गावामध्ये. तिथे त्यांना आढळलं की, हे अख्खं गावच सायबर गुन्हेगारी विशेषत: ‘सेक्स्टॉर्शन’मध्ये गुंतलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिनांक २८ सप्टेंबर, २०२२ : पुण्यातील दत्तवाडी येथील एका १९ वर्षांच्या तरुणानं राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

दिनांक ३० सप्टेंबर, २०२२ : पुण्यातील धनकवडीत २२ वर्षांच्या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली.

दोन दिवसांच्या अंतरानं घडलेल्या या दुर्दैवी घटनांमध्ये एक समान सूत्र होतं ते म्हणजे दोन्ही तरुण ‘सेक्स्टॉर्शन’च्या जाळ्यात अडकले होते. समाजमाध्यमावर मैत्री झालेल्या अनोळखी तरुणीनं नग्न, अर्धनग्न अवस्थेतील व्हिडीओ, छायाचित्रं व्हायरल करण्याची धमकी सातत्यानं देत खंडणीसाठी मानसिक त्रास दिल्यानं या तरुणांनी बदनामीच्या भीतीनं जीवन संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. लागोपाठ दोन आत्महत्यांच्या घटना घडल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणांचा कसून शोध सुरू केला. या तरुणांकडे ज्या मोबाइल क्रमांकांवरून खंडणी मागण्यात आली होती, त्या मोबाइल क्रमांकांचं लोकेशन पुणे पोलिसांनी ट्रेस केलं. हे ठिकाण होतं, राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ तालुक्यातील गोठडी गुरू हे गाव. ही माहिती मिळताच पुणे पोलिसांचं एक पथक राजस्थानात दाखल झालं.

पुणे पोलिसांच्या पथकानं गोठडी गुरू गावाजवळ जाऊन तपास केला असता अन्वर खान सुबान खान (वय २९) याचं नाव समोर आलं. मात्र गावात प्रवेश करणं कठीण असल्याचं पोलिसांना जाणवलं. गावाच्या वेशीबाहेर बसलेलं गावातील तरुणींचं एक टोळकं अनोळखी माणूस दिसताच त्याची वर्दी गावात देत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यामुळे शक्कल लढवत पुणे पोलिसांचं पथक राजस्थानी वेश परिधान करून थेट गावात दाखल झालं. गावातील वातावरण पाहून पोलिस चक्रावून गेले. गावातील घरं साधी मातीची होती, मात्र जवळपास प्रत्येक घराबाहेर आलिशान गाडी उभी होती. गावकऱ्यांचं राहणीमानही छानछोकीचं होतं. गावात प्रवेश करण्याची लढाई तर फत्ते झाली, पण आता कसोटी होती ती आरोपी अन्वर खानच्या मुसक्या आवळण्याची. पेालिसांनी आपलं कौशल्य पणाला लावत अन्वरचा ठावठिकाणा शोधून काढला आणि त्याला अटक करण्यासाठी तिथे पोहोचले. तेव्हा गावातील लोकांनी पोलिस पथकावर हल्ला केला. मात्र, आरोपीच्या सुटकेचा प्रयत्न फसला आणि त्याला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं.

असं चालतं ‘सेक्स्टॉर्शन’ रॅकेट
पोलिसांनी आरोपी अन्वरकडे चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्याने पोलिसांना सांगितलं की, गोठडी गुरू गावातील सुमारे २,५०० स्त्री-पुरुष ‘सेक्स्टॉर्शन’च्या रॅकेटमध्ये सामील आहेत. हे ऐकून पोलिस अधिकारीही आश्चर्यचकित झाले. संपूर्ण गाव या गुन्ह्यात कसं सहभागी झालं आहे, याची सुरस कहाणीच अन्वरनं पोलिसांना ऐकवली. अन्वर हाच ‘सेक्स्टॉर्शन’चं हे रॅकेट चालवणारा मास्टरमाइंड असल्याची माहिती पोलिसांना चौकशीदरम्यान मिळाली. गावातील स्त्री-पुरुष हेरलेल्या ‘माशां’ना जाळ्यात अडकवण्यात अन्वरला मदत करतात. त्यापैकी काही जण समाजमाध्यमावर समोरच्या व्यक्तीशी मैत्री करतात. त्या व्यक्तीशी चॅट करून त्याला स्वत:चे नग्न/अर्धनग्न व्हिडीओ किंवा छायाचित्रं पाठवण्यास भाग पाडतात. त्यानंतर हे व्हिडीओ किंवा छायाचित्रं व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली जाते. काही ग्रामस्थ असे गुन्हे करण्यासाठी लागणारी सिमकार्ड पुरवण्याचं काम करतात आणि नंतर अशी काही बँक खाती तयार करतात जिथे खंडणीची रक्कम जमा केली जाते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आणखी काही लोक संभाव्य ‘सेक्स्टॉर्शन’बळींची वैयक्तिक माहिती, छायाचित्रं किंवा व्हिडीओ क्लिप गोळा करण्यात गुंतलेले असतात. जेणेकरून नंतर त्यांचा वापर करून पैसे उकळता येतील.

‘जामताडा’ला मागे टाकलं

अलीकडच्या काळात ऑनलाइन गंडा घालून प्रकाशझोतात आलेल्या झारखंडमधील जामताडा जिल्ह्यातील जामताडा शहराची आठवण गोठडी गुरू गावानं ताजी केली. जामताडाच्या कहाणीनं तर एका गाजलेल्या वेबसीरिजला जन्म दिला. मात्र या दोन गावांमध्ये फरक इतकाच की, जामताडामधील अर्धवट शिकलेले किंवा अशिक्षित तरुण झटपट श्रीमंत होण्यासाठी देशभरातील लोकांना ऑनलाइन गंडा घालण्याचं काम करत होते. तर, गोठडी गुरू हे संपूर्ण गावच ‘सेक्स्टॉर्शन’च्या गुन्ह्यात अडकलं आहे. या बाबतीत गोठडी गुरू गावाने जामताडालाही मागे टाकलं आहे. ३२० हेक्टरवर पसरलेलं गोठडी गुरू गाव ५६० उंबऱ्यांचं आहे. येथील लोकसंख्येच्या तुलनेत निम्म्याहून अधिक (५४.६१ टक्के) लोकांची अक्षरओळखही झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक घरातील कोणी ना कोणी झटपट पैसे मिळवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. या गावाने आजवर देशभरातील अनेक नावाजलेले उद्योजक, न्यायाधीश, वकील, प्राध्यापक, रेल्वेचे अधिकारी यांना ‘सेक्स्टॉर्शन’च्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. खंडणीची रक्कम काही हजारापासून सुरू होते आणि ती कधी कधी लाखो रुपयांपर्यंतही जाते. धक्कादायक बाब म्हणजे आता या गावात आजूबाजूच्या गावांतील मुलांना ऑनलाइन गंडा घालण्याचं प्रशिक्षण देणारे कोर्स चालवले जातात. पुणे पोलिसांमुळे गोठडी गुरू गावाचे प्रताप चव्हाट्यावर आले असले तरी राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांतील ग्रामीण भागांत ऑनलाइन गंडा घालण्याची रॅकेट चालवली जातात. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणांसमोरही मोठं आव्हान आहे.

बदनामीच्या भीतीनं तक्रारींचं प्रमाण कमीच

मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये अशा घटनांची संख्या गेल्या वर्ष-दीड वर्षात चौपट झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तर ‘सेक्स्टॉर्शन’च्या तक्रारींचं प्रमाण खूपच आहे. तक्रारदारांची संख्या वाढत असली तरी बदनामीच्या भीतीने तक्रार दाखल न करणाऱ्यांचं प्रमाण अधिक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.