गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना क्लीन चीट
देश बातमी

गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना क्लीन चीट

लखनौ : गँगस्टर विकास दुबेच्या एन्काऊंटरप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना अखेर क्लीन चिट देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती बी. एस. चौहान समितीने दिलेल्या अहवालात हा निर्णय दिला आहे. आठ महिन्यांच्या तपासणीनंतर समितीला कोणताही साक्षीदार सापडला नाही, पोलिसांनी एन्काऊंटर जाणीवपूर्वक केल्याचा किंवा फेक एन्काऊंटर असल्याचे तपासातून स्पष्ट होत नसल्याचे सांगत न्यायालायाने हा निर्णय दिला असल्याचे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तपासादरम्यान न्यायमूर्ती बी.एस. चौहान यांनी अनेक पोलिसांकडे चौकशी केली. मात्र, एन्काऊंटर बनावट असल्याचे सिद्ध करण्यासाठी समितीला एकही सबळ पुरावा मिळाला नाही. पुराव्याअभावी विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

2 जुलै 2020 च्या रात्री विकास दुबे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बिकेरू गावी गेलेल्या पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबारात 8 पोलीस शहीद झाले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्या चार कार्यकर्त्यांना ठार मारले. परंतु, मुख्य आरोपी विकास दुबे फरार झाला. 9 जुलै रोजी विकास दुबे उज्जैनच्या महाकाळ मंदिरात शरण आला. यानंतर उज्जैनहून परत येत असताना पोलिसांची गाडी पलटी झाली, त्यानंतर विकास दुबेने पोलिसांचे पिस्तूल घेऊन पळ काढला. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना त्याने पोलिसांवरच गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि चकमकीत विकास दुबेचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले होते. अखेर न्यायालयीन चौकशीतही हा एन्काऊंटर योग्य मानला गेला आहे.