संकट टळलेलं नाही; कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
कोकण बातमी

संकट टळलेलं नाही; कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : दोन दिवसांपासून सुरु असलेला पाऊस पुढचे दोन दिवस देखील असाच अतिमुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २३ जुलै आणि २४ जुलै या दोन दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये कालपासून कोसळणाऱ्या पावसांने पुरती वाताहत केली असून आत्तापर्यंत पावसामुळे राज्यभरात ४४ मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या या अंदाजानंतर प्रशासकीय यंत्रणा अधिकच सतर्क झाल्या आहेत. पावसाचं अक्राळ-विक्राळ रुप राज्याच्या काही भागांमध्ये आधीच थैमान घालत असताना पुढच्या २४ तासांमध्ये देखील हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर पुढचे २ ते ३ दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचं प्रमाण कमी होत जाईल. मात्र, त्यासोबतच कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार आहे. उद्या अर्थात २४ जुलै रोजी देखील हे प्रमाण कायम राहणार असून त्यानंतर ते कमी होत जाईल. त्यासोबतच, कर्नाटकमध्ये किनारी भाग आणि दक्षिण कर्नाटकमध्ये देखील आज दिवसभर अशाच प्रकारे अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.