नाटककार, लेखक जयंत पवार काळाच्या पडद्याआड
बातमी महाराष्ट्र

नाटककार, लेखक जयंत पवार काळाच्या पडद्याआड

मुंबई : नाटककार, लेखक, संवेदनशील विचारवंत जयंत पवार यांचे रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी लेखिका-पत्रकार संध्या नरे आणि मुलगी असा परिवार आहे. जयंत पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी बोरिवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जयंत पवार यांच्या निधनामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणारा आणि सामाजिक, राजकीय प्रश्नांवर निर्भयपणे भूमिका घेणारा लेखक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. गेली सात-आठ वर्षे जयंत पवार कर्करोगाशी झुंज देत होते. आजारपणातही त्यांनी आपले लेखन, चिंतन सोडले नाही. शेवटपर्यंत ते लिखाणात मग्न होते. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा त्याविरोधात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून त्यांनी लढा दिला. सामाजिक-राजकीय परिस्थितीचे भान ठेवत अन्याय्य घटनांवर आपल्या नाटकांतून-साहित्यातून प्रकाश टाकणाऱ्या जयंत पवार यांच्यासारख्या भाष्यकाराची उणीव कधीही भरून निघणार नाही. विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना स्मशानभूमीत गाण्यांतून अखेरची मानवंदना दिली.

अस्सल गिरणगावकर असलेल्या जयंत पवार यांनी गिरणगाव ते महानगर हा मुंबईचा झपाटय़ाने बदलत गेलेला चेहरामोहरा फार जवळून अनुभवला. गिरण्या बंद पडल्यानंतर विस्थापित झालेले कामगार, बेरोजगारी-गरिबीसारख्या समस्यांशी तोंड देताना अगतिक, असाहाय्य होत गेलेल्या या शहरातील सर्वसामान्यांचे जगणे त्यांच्या नाटकांमधून प्रभावीपणे उतरले.