जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांना मार्चअखेरपर्यंत नळजोडणी देणार:  गुलाबराव पाटील
उत्तर महाराष्ट् बातमी

जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांना मार्चअखेरपर्यंत नळजोडणी देणार: गुलाबराव पाटील

जळगाव : जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकासह विद्यार्थ्यांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे. याकरीता जळगाव जिल्हा परिषदेच्या 2764 शाळा व 3076 अंगणवाड्यांना मार्चपर्यंत स्वतंत्र नळजोडणी दिली जाईल. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिली. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हा नियोजन भवनात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही याकरीता लोकप्रतिनिधींनी कामे सुचवितांना गावांच्या पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य द्यावे. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना विकास कामांसाठी यावर्षी 5 लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याप्रमाणे पुढील वर्षाच्या नियोजनातही 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल. त्याचप्रमाणे कवयित्रि बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

जळगाव शहरातील व्यापारी गाळयांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महापालिका आयुक्त, महापौर व व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबविण्यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शासनाची मान्यता मिळाल्याबरोबर निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच समिती सदस्यांच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे दोन विभाग करण्याचा ठरावही या बैठकीत मान्य करण्यात आला.

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध व्हावेत, याकरीता जिल्ह्यात शेत पाणंद रस्ते योजना पुढील आर्थिक वर्षातही राबविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी बैठकीत केली त्यासही मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना प्राथमिक आजारांवरील औषधे उपलब्ध व्हावी याकरीता औषधे खरेदीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल. परंतु रुग्णांना बाहेरुन औषधे आणावी लागणार नाही त्याचबरोबर किरकोळ कारणांसाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविले जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.

बैठकीच्या सुरवातीला जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की, केलेल्या नियोजनानुसार सर्व विभागांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्हा परिषदेला स्पीलसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीची कामे मार्चअखेर पूर्ण करावी. जिल्हा परिषदेच्या शाळांना वॉलकम्पाऊंडसाठी, शासकीय आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांच्या दुरुस्ती, औषधोपचारासाठी व वीजेसंबंधीच्या कामांना विशेष तरतुद जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात करण्यात येत असल्याचे बैठकीत सांगितले.