बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु : जिल्हाधिकारी
बातमी मराठवाडा

बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु : जिल्हाधिकारी

नांदेड : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबत एकही केस आढळलेली नाही. जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा व विशेषत: पशुसंवर्धन यंत्रणेला अधिक सतर्कतेचे निर्देश दिले असून याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना केल्या आहेत. जनतेने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी ज्या काही पाणथळाच्या जागा असतील त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सुचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. बर्ड फ्ल्यू संदर्भात अपूऱ्या व चुकीच्या माहितीवर कोणी जर दिशाभूल केली अथवा अफवा पसरविल्या तर त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करु, असा सक्त इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून कोरोना लसीकरण आणि बर्ड फ्ल्यूबाबतच्या नियोजनाबाबत आढावा घेवून निर्देश दिले. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शरद पाटील, पशुसंवर्धन व वन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, सोमवारी राज्यात परभणी जिल्ह्यातील मुरूंबा या ठिकाण बर्ड फ्लू’ने ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. यांनी या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं सांगितले. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व मारण्याचे आदेश देण्यात आले असून, दहा किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

तसेच, मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याने या गावाला प्रतिबंधक क्षेत्र म्हणूनही जाहीर करण्यात आलं असून या गावात कोंबड्यांची खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोंबड्यांची वाहतूक करण्यासही मनाई करण्यात आली आहे.