महाराष्ट्रापेक्षा आम्हीच तुम्हाला पाणी देऊ शकतो; सीमा प्रश्न वादात कर्नाटकने डिवचले
पश्चिम महाराष्ट्र बातमी

महाराष्ट्रापेक्षा आम्हीच तुम्हाला पाणी देऊ शकतो; सीमा प्रश्न वादात कर्नाटकने डिवचले

महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगत असतानाच कर्नाटकने गुरुवारी या तालुक्यात पाणी सोडून पुन्हा डिवचले. पाणी द्या नाही तर, कर्नाटकात जाऊ असा इशारा देणाऱ्या जतकरांना पाणी देत महाराष्ट्रापेक्षा आम्हीच तुम्हाला पाणी देऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न कर्नाटकाने केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आठ दिवसापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा केला. पण तालुक्यातील बहुसंख्य गावांनी कर्नाटकात कर्नाटकात जाण्यास विरोध केला. मात्र तिकोंडी, उमराणी यासह काही गावांनी महाराष्ट्राने म्हैशाळ योजनेचे पाणी न दिल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर मुंबईला गेलेल्या शिष्टमंडळाला तसेच जतचे आमदार विक्रम सावंत यांना या योजनेला तत्वता मान्यता देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एकीकडे तालुक्यात सीमावाद वादग्रस्त ठरला असतानाच कर्नाटकने मात्र गुरुवारी तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी तिकोंडी गावात सोडले. यामुळे तेथील तलाव भरला असून हे पाणी आणखी दहा ते पंधरा गावात दोन दिवसात पोहोचण्याची शक्यता आहे. आम्ही पाणी देऊ शकतो हे दाखवण्यासाठीच कर्नाटकाने ही खेळी केली आहे. यामुळे आता मात्र सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

जत तालुक्यातील ४२ गावानी पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. त्यातील काही गावात म्हैशाळ योजनेचे पाणी पोहोचले आहे. पण अजूनही बरीच गावे तहानलेली आहेत. त्यांना पाणी देऊन आपल्याकडे ओढण्याचा कर्नाटकचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी सोडण्यात आले.