लसीकरण हाच कोरोना नियंत्रणावर सर्वोत्तम उपाय
बातमी विदेश

लसीकरण हाच कोरोना नियंत्रणावर सर्वोत्तम उपाय

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख डॉ. टेद्रोस अडानोम गेब्रेयिसस यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून गुरुवारी चिंता व्यक्त केली. लसीकरण हाच कोरोना महासाथीवरील नियंत्रणाचा आणि जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा सर्वोत्तम उपाय असल्यामुळे प्रत्येक देशातील किमान १० टक्के लोकांचे सप्टेंबरपर्यंत लसीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लशींच्या पुरवठ्याबाबत फार मोठ्या प्रमाणावर असमानता आढळून येत आहे. काही देशांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात लसीकरण केले असतानाच इतर अनेक देशांकडे त्यांचे आरोग्य कार्यकर्ते, वयोवृद्ध लोक आणि जोखीम असलेले इतर गट यांना देण्यासाठी पुरेशा लसी नाहीत, असे डब्ल्यूएचओचे महासंचालक असलेले गेब्रेयिसस यांनी इंडिया ग्लोबल फोरमला दूरसंवादाद्वारे संबोधित करताना सांगितले. काही देश लसीकरण करू शकत नसतील, तर त्यामुळे सर्वच देशांना धोका असल्याचे आवर्जून सांगताना गेब्रेयिसस यांनी प्रत्येक देशाच्या किमान १० टक्के लोकसंख्येचे लसीकरण सप्टेंबरपर्यंत, किमान ४० टक्के लोकांचे वर्षअखेरपर्यंत आणि किमान ७० टक्के लोकांचे पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी जागतिक प्रयत्नांचे आवाहन केले.

लशींच्या बाबतीत समानता एवढी एकच गोष्ट पुरेशी नाही. महासाथीवर नियंत्रण ठेवण्याचा आणि जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा तो सर्वोत्तम उपाय आहे, असे गेब्रेयिसस म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दर देशनिहाय असमान असून, त्याचे प्रमाण काही देशांमध्ये लोकसंख्येच्या १ टक्का, तर इतर देशांमध्ये ते ६० टक्क्यांहून अधिक आहे.