कोण होते शेतकरी आंदोलनात आत्महत्या करणारे संत बाबा राम सिंह?
देश बातमी

कोण होते शेतकरी आंदोलनात आत्महत्या करणारे संत बाबा राम सिंह?

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आत्महत्या करताना त्यांनी एक चिठ्ठी लिहली आणि शेतकऱ्यांचा त्रास बघवत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले. त्यानंतर शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणावर चिघळण्याची शक्यता आहे. कारण, बाबा राम सिंह यांचे मोठ्या प्रमाणावर अनुयायी आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोण आहेत संत बाबा राम सिंह?
संत बाबा राम सिंह हे ६५ वर्षांचे होते. ते करनालमधील रहिवासी होते. हरयाणा आणि पंजाबबरोबरच जगभरामध्ये बाबा राम सिंह यांचे लाखो अनुयायी आहेत. त्यांनी अनेक शीख संघटनांची महत्वाची पदं भूषवली आहेत. संत बाबा राम सिंह यांचा मुख्य व्यवसाय शेती होता. तसेच ते धार्मिक उपदेशक म्हणूनही काम करायचे.

मागील काही दिवसांपासून ते दिल्लीत होते आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवत होते. त्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिबीर ठेवलं होतं. त्यांनी या शेतकऱ्यांसाठी चादरीही वाटल्या होत्या. संत बाबा राम सिंह यांचा मठ करनाल जिल्ह्यातील सिंगडा गावात आहे. ते सिंगडावाले बाबा या नावाही लोकप्रिय होते. बाबा हे सिंगाडा येथील मठाबरोबरच जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवचनासाठी जायचे. संत बाबा राम सिंह हे कायमच सर्व वादांपासून दूर राहिले. त्यांनी सामाजिक आणि आर्थिक सुधारणेसाठी खूप मोठं योगदान दिलं. शीख सामाजाबरोबरच सगळीकडे त्यांना मानसन्मान दिला जायचा.