धमकीची माहिती दिल्यानंतर अदर पूनावालांची प्रतिक्रीया; दिला हा शब्द
देश बातमी

धमकीची माहिती दिल्यानंतर अदर पूनावालांची प्रतिक्रीया; दिला हा शब्द

पुणे : सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला यांनी नुकतंच एका मुलाखतीत धमकवणारे फोन येत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पण त्यानंतर त्यांनी एक ट्विट केले असून एक शब्द दिला आहे. ते सध्या लंडनमध्ये असून लवकरच भारतात परतेन असं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे. अदर पुनावाला यांनी सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल यासंदर्भात मी कोणाचं नाव घेतलं किंवा उत्तर दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल अशी भीती व्यक्त करत धमकीचे फोन येत असल्याचे म्हटल्यावर त्यांनी हे ट्विट केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कंपनीचे भागिदार आणि स्टेकहोल्डर्स यांच्यासोबत ब्रिटनमध्ये बैठक पार पडली. बैठक चांगल्या पद्धतीने झाली. पुण्यात कोव्हिशिल्डचं उत्पादन जोरात सुरु आहे. मी काही दिवसात परत आल्यानंतर लस उत्पादनाची समीक्षा करेन, अशा आशयाचं ट्विट अदर पुनावाला यांनी केलं आहे.

दरम्यान, अदर पुनावाला यांनी ब्रिटनमधील मायफेअर येथे एक आलिशान बंगला भाड्याने घेतला आहे. अदर पूनावाला हे सध्या कुटुंबासोबत ब्रिटनमध्ये आहेत. तिथेच त्यांनी ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत या दबावाबद्दल माहिती दिली तसेच सीरम इन्स्टिट्यूट आता देशाबाहेर लस निर्मितीचा प्लॅन्ट सुरू करण्याचेही नियोजन करत असल्याचंही ते म्हणाले होते. सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या दोन लसींना भारत सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, आत्तापर्यंत देशात झालेल्या लसीकरणामध्ये सर्वाधिक लसीकरण हे अदर पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीचं झालं आहे.