चीनमध्ये झाली लोकसंख्येत घट; सरकारने घेतला मोठा निर्णय!
बातमी विदेश

चीनमध्ये झाली लोकसंख्येत घट; सरकारने घेतला मोठा निर्णय!

नवी दिल्ली : चीनची एक मोठी चिंता म्हणजे देशात तरुणांची घटती संख्या आहे. यासाठी त्यांनी मे महिन्यात आपल्या धोरणात मोठा बदल केला. या बदललेल्या धोरणाअंतर्गत चीनमधील जोडप्यांवर आता तीन मुलांना जन्म देण्यासाठी विविध प्रकारे दबाव आणला जात आहे. या धोरणांतर्गत, चीनच्या स्थानिक सरकारने तिसरे अपत्य असलेल्या जोडप्यांना रोख रक्कम तसेच इतर सुविधा देणे सुरू केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चीनच्या गांसु प्रांतातील लिंजे काउंटीने तीन मुलं असलेल्या जोडप्यांसाठी राज्याचा खजिना उघडला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, येथे जोडप्याचे तिसरे अपत्य जन्माला येताच त्यांना एकहाती ५ हजार युआन (सुमारे ५७ हजार रुपये) दिले जात आहेत. ही माहिती स्थानिक सरकारने चिनी सोशल मीडिया WeChat वर एका पोस्टद्वारे दिली आहे. एवढेच नाही तर, जेव्हा मूल ३ वर्षांचे होणार आहे, तेव्हा त्याला पहिल्या वर्षी १० हजार युआन (सुमारे १ लाख १४ हजार रुपये) देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी अशा कुटुंबांना शाळेचे शुल्क आणि मुलांसाठी घरे खरेदीचे अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे.

लोकसंख्येवर देशाची आर्थिक गणितं बांधली जात असतात. लोकसंख्येचा थेट प्रभाव अर्थकारणावर पडत असतो. यामुळे लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचं अर्थतज्ज्ञांकडून सुचवलं जातं. चीनने काही वर्षांपासून लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक नियम घातले होते. टू चाइल्ड पॉलिसी अंतर्गत दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी होती. या नियमामुळे देशातील लोकसंख्या नियंत्रणाला आली. मात्र देशातील अर्ध्याहून अधिक नागरिक वयोवृद्ध होत असल्याने चीनची चिंता वाढली आहे. त्यामुळे हा नियम शिथील करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. चीनमध्ये आता दांपत्य तीन मुलांना जन्म देऊ शकतात.