कोरोना लस घेतल्यावर महिलांना मिळतेय सोन्याची नथ
देश बातमी

कोरोना लस घेतल्यावर महिलांना मिळतेय सोन्याची नथ

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात वाढत असताना सध्या लसीकरण मोहिमे देखील वेगवान करण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत 8 कोटीहून अधिक लोकांना कोरोना लस दिली गेली आहे. लोकांनी लस घ्यावी यासाठी सरकारकडून सतत प्रवृत्त केले जात आहे. त्याचबरोबर देशाच्या विविध भागातील लोकांना प्रेरित आणि प्रोत्साहित केले जातंय. यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांद्वारे पुढाकार घेण्यात येत आहेत. एका ठिकाणी कोरोना लस घेतल्यानंतर महिलांना सोन्याची नथ दिली जात आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजकोटमधील स्वर्णकार समाजाने कोरोना लस घेण्यासाठी प्रोत्साहन म्हणून हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. लसीकरण कॅम्पमध्ये येणार्‍या लोकांना विशेष भेट वस्तूही दिल्या जात आहेत. लस घेणार्‍या लोकांचा उत्साह वाढविण्यासाठी हे केले जात आहे. स्वर्णकार समाजाच्या वतीने राजकोट शहरात कोरोना लसीकरण शिबिर सुरु करण्यात आलं आहे. या शिबिरात लसीकरण करणार्‍या महिलांना सोन्याचे नोझपिन (नथ) देण्यात येत आहे. त्याचवेळी लस घेणाऱ्या पुरुषांना भेटवस्तूमध्ये हँड ब्लेंडर देण्यात येत आहे.

राजकोटच्या या शिबिरात स्वर्णकार समुदायाने भेटवस्तू जाहीर झाल्यापासून नागरिकांनी गर्दी केली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार स्वर्णकार समाजाच्या लसीकरण शिबिरात लोकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.