स्विगी आणि झोमॅटोबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

स्विगी आणि झोमॅटोबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रात वेगाने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर स्विगी आणि झोमॅटोबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवार-रविवार लॉकडाऊन आणि आठवड्याच्या इतर दिवशी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर सर्व सेवांप्रमाणेच खाद्यसेवा देणाऱ्या स्विगी आणि झोमॅटो यांच्या सेवादेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री ८ नंतर झोमॅटो किंवा स्विगीवरून आता अन्नपदार्थ मागवता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोन्ही अॅपवरून ग्राहकांना त्यासंदर्भात माहिती दिली जात असून संध्याकाळी ८च्या आतच ऑर्डर देण्यासंदर्भात सूचना केली जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नवे निर्बंध लागू झाल्यापासून म्हणजेच ५ एप्रिलपासूनच ग्राहकांना तशा प्रकारच्या सूचना मोबाईल अॅप्लिकेशनमधून मिळू लागल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने शनिवार-रविवार हे वीकएंडचे दिवस वगळता आठवड्याच्या इतर दिवशी संध्याकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यासोबतच, दिवसाच्या इतर वेळी जमावबंदीचे देखील आदेश देण्यात आले आहेत. या काळामध्ये हॉटेल, रेस्टॉरंटमधून फक्त पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या निर्बंधांनुसार स्विगी आणि झोमॅटोनं सेवा बंद केली असली, तरी मुंबई महानगर पालिकेने ७ एप्रिल रोजी काढलेल्या परिपत्रकामध्ये अशा कंपन्यांचा २४ तास सेवा देण्याची परवानगी दिली आहे. झोमॅटो, स्विगीसारख्या ऑनलाईन अन्नपदार्थांची डिलीव्हरी करणाऱ्या सेवा पुरवठादारांना २४ तास आठवड्याचे सातही दिवस त्यांच्या या सेवा सुरू ठेवता येतील असं या पत्रकात म्हटलं आहे.