इंजेक्शनशिवायच दिली जाणार कोरोना लस; डीसीजीआयकडे अर्ज
देश बातमी

इंजेक्शनशिवायच दिली जाणार कोरोना लस; डीसीजीआयकडे अर्ज

नवी दिल्ली : भारतात सध्या दिल्या जाणाऱ्या लशी या इंजेक्शनमार्फत दिल्या जात आहेत. पण आता लवकरच इंजेक्शनशिवायही लस दिली जाणार आहे. विशेष म्हणजे ही लस लहान मुलांसाठीही उपलब्ध होणार आहे. झायडस कॅडिला कंपनीची झायकॉव्ह डी कोरोना लस आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

झायकॉव्ह डी लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याकरिता झायडस कॅडिलाने भारतीय औषध नियामक प्राधिकरणाकडे अर्ज केला आहे. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, त्यात 28 हजार जण सहभागी झाले होते. दुसऱ्या लाटेदरम्यान देशात 50 ठिकाणी या लशीच्या चाचण्या झाल्या होत्या. त्यांचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. तसंच, डेल्टा व्हेरिएंटवरही ही लस प्रभावी असल्याचं सांगितलं जात आहे. भारतातली कोणत्याही लशीसाठीही आतापर्यंतची ही सर्वांत मोठी चाचणी होती. सुरुवातीच्या टप्प्यात ही लस 66 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं होतं.

Zycov-D या लशीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक डोसमध्ये 28 दिवसांचं अंतर असेल. सध्या लसीकरण सुरू असलेल्या लशींचे दोनच डोस घ्यावे लागत आहेत. कॅडिला कंपनीच्या या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात घेतलेल्या चाचण्यांमध्ये असं आढळलं, की तीन डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती दीर्घ काळपर्यंत टिकून राहते. या लशीच्या दोन डोसच्या प्रभावाबद्दलच्या चाचण्याही सुरू आहेत. Zycov-D या लशीच्या चाचण्या प्रौढांवर, 12 ते 18 वयोगटातल्या व्यक्तींवर, तसंच गंभीर विकार असलेल्या व्यक्तींवर घेतल्या गेल्या. 12 ते 18 वयोगटातल्या मुलांवर लशीचे साइड इफेक्ट्स दिसले नाहीत, असं कंपनीचं म्हणणं आहे. त्यामुळे लशीला परवानगी मिळाली, तर ती 18 वर्षांखालच्या व्यक्तींसाठी देशातली पहिली लस ठरेल. 5-12 या वयोगटातल्या मुलांवरही या लशीच्या चाचण्या घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

इंजेक्शन नाही तर फार्माजेटद्वारे दिली जाणार लस
झायकॉव्ह डी ही लस आणखी एका बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही लस घेताना संबंधित व्यक्तीला कमीत कमी वेदना होण्याच्या दृष्टीने ही लस सुईद्वारे नाही, तर सुई नसलेल्या फार्माजेट इंजेक्टरद्वारे दिली जाणार आहे. यात लस उच्च दाबाखाली व्यक्तीच्या त्वचेत दिली जाते. यात साइड इफेक्टचा धोका कमी होतो, असं मानलं जातं. त्याला जेट इंजेक्टर असंही म्हणतात. 1960मध्ये विकसित झालेल्या जेट इंजेक्टरच्या वापराला जागतिक आरोग्य संघटनेने 2013मध्ये परवानगी दिली. 2014पासून अमेरिकेत याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला असून, युरोप, आफ्रिका आणि आशियातल्या काही देशांमध्येही त्याचा काही प्रमाणात वापर होतो.